Dhanashri Vikhe Patil : दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे : धनश्री विखे पाटील

Dhanashri Vikhe Patil : दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे : धनश्री विखे पाटील

0
Dhanashri Vikhe Patil : दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे : धनश्री विखे पाटील
Dhanashri Vikhe Patil : दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे : धनश्री विखे पाटील

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त दिव्यांगांना साहित्याचे वाटप

Dhanashri Vikhe Patil : नगर : दिव्यांग (Person with a disability) मुलांमध्येही इतर मुलांप्रमाणेच स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची क्षमता आहे. त्यांच्यात विविध कला आणि कौशल्ये आहेत; मात्र त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येकाने आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना मनात ठेवून दिव्यांगांच्या मदतीसाठी पुढे यावे. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील (Dhanashri Vikhe Patil) यांनी दिली.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा जीवनगौरव

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त शोभा सर्वोदय फाउंडेशन आणि दिव्य दृष्टी दिव्यांग विकास व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट, पांढऱ्या काठ्या आणि बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

Dhanashri Vikhe Patil : दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे : धनश्री विखे पाटील
Dhanashri Vikhe Patil : दिव्यांगांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी समाजाने पुढे यावे : धनश्री विखे पाटील

धनश्री विखे पाटील म्हणाल्या, (Dhanashri Vikhe Patil)

समाजसेवेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल महत्त्वाचे असते. अशा उपक्रमांना समाजानेही पाठबळ दिले पाहिजे. दिव्यांग मुलांनाही इतर मुलांप्रमाणेच शिक्षण, कला आणि प्रगतीच्या संधी मिळाल्या पाहिजेत. त्यांच्यातील कौशल्यांना वाव मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे.

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी एकत्र येण्याचा संकल्प : नरेंद्र फिरोदिया

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. त्याच भावनेतून दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ‘आय लव्ह नगर’सह विविध फाउंडेशनच्या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. आजच्या दिवसापासून सक्षमीकरणाचा संकल्प करून पुढील एका वर्षात ठोस बदल घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रगतीची संधी

अहिल्यानगर ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने म्हणाले, दिव्यांगांच्या मदतीसाठी अनेक माध्यमातूनही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. स्पर्धा परीक्षा हे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रगतीच प्रभावी माध्यम ठरू शकते. विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळावे. त्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ब्रिगेडियर राजीव चावला यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय) आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग वेगाने पुढे जात असल्याचे सांगितले. या बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करता येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

कार्यक्रमात विकास बाजीराव घोगरे, अनिता माने आणि अंध व्यक्तींसाठी कार्य करणारे सुनील पराभने यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आकांक्षा दिव्यांग कार्यालयाच्या संचालिका सविता काळे, सामाजिक कार्याबद्दल महिला समीक्षक करण, तसेच महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल संध्या मेढे यांचा गौरव करण्यात आला.

गोरख दरंदले यांचा सत्कार ब्रिगेडियर चावला यांच्या हस्ते करण्यात आला, तर निलेश गर्जे यांचा सन्मान पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील नेत्रदान चळवळीतील योगदानाबद्दल जालिंदर बोरुडे यांचाही उल्लेख करण्यात आला.

महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना साहित्याचे किट वितरित करण्यात आले. तसेच अंध विद्यार्थ्यांना पांढऱ्या काठ्या, बॅग आणि आवश्यक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांगांना केवळ मदत न करता त्यांना स्वावलंबी बनविण्याचा आणि त्यांच्या क्षमतांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.