October Heat : ‘ऑक्टोबर हीट’चा फटका; राज्यात विजेची मागणी वाढल्याने पुरवठा खंडित

0
October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा फटका; राज्यात विजेची मागणी वाढल्याने पुरवठा खंडित

नगर :  महाराष्ट्रात ‘एल निनो’, कोळशाची टंचाई आणि ‘ऑक्टोबर हीट’मुळे (October Heat) विजेची मागणी आणि पुरवठा (Electricity Demand and Supply) यांचा ताळमेळ बिघडलाय. त्यामुळे राज्यासह देशाच्या ऊर्जा क्षेत्राचा कणा असलेल्या राष्ट्रीय वीज ग्रिडवर संकट निर्माण झाले आहे. सायंकाळी ग्रिडची फ्रिक्वेन्सी घसरत असल्याने या ग्रिडशी जोडलेल्या महापारेषणच्या उपकेंद्रांतील फीडर हे ट्रिप होत आहेत. याचाच परिणाम म्हणून राज्याच्या अनेक भागांत अचानक काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित (Power supply interrupted) होऊन अंधार पसरत आहे.

नक्की वाचा : ‘बेरोजगार सुषमाताईंचा पुन्हा एकदा अभ्यास कमी पडला’; विक्रम पाचपुते यांची टीका

ग्रीड म्हणजे काय? (October Heat)

 ग्रिड म्हणजे वीजकेंद्रांपासून घरे आणि उद्योगांपर्यंत वीज पोहोचविणाऱ्या पारेषण यंत्रणेचे जाळे. ही यंत्रणा अत्यंत काटेकोर नियमांनुसार नियंत्रित केली जाते. केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने यासाठी मानके निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रिडची फ्रिक्वेन्सी ४९.९० ते ५०.०५ हर्ट्झ दरम्यान राखणे आवश्यक आहे. फ्रिक्वेन्सी या मर्यादित न राहिल्यास ग्रिडची स्थिरता धोक्यात येऊ शकते. ही संपूर्ण यंत्रणा राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या म्हणजेच (नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर) च्या नियंत्रणाखाली चालते. 

देशभरात विजेची वाढती मागणी आणि पुरवठ्यातील संभाव्य तफावतीमुळे ग्रिडची स्थिरता कायम राखण्याचे आव्हान वाढले आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी ६ वाजल्यानंतर, म्हणजेच सौरऊर्जेचे उत्पादन घटल्यानंतर, ग्रिडची फ्रिक्वेन्सी ४९.४ ते ४९.३ हर्टझपर्यंत घसरत असल्याचे सांगण्यात येतंय. महापारेषणच्या सूत्रांनुसार, ग्रिडचे संरक्षण करण्यासाठी काही भागांतील वीजपुरवठा स्वयंचलित पद्धतीने कमी करून मागणी आणि पुरवठ्यातील तफावत सध्या भरून काढली जात आहे.

अवश्य वाचा : जामखेडमध्ये युवकावर कोयत्याने हल्ला, मनगटापासून तुटला हात; कारण काय?

संकटाचे कारण? (October Heat)

महापारेषणच्या सूत्रांनुसार, महाराष्ट्र हा पश्चिम क्षेत्रीय ग्रिडचा भाग आहे. या क्षेत्रातील औष्णिक वीजकेंद्रे आणि गॅसवर आधारित प्रकल्पांमधील अनेक संच हे बंद असल्याने विजेची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढली आहे. दिवसा सौरऊर्जेचे उत्पादन सुरू असल्यामुळे परिस्थिती तुलनेने नियंत्रणात राहते. मात्र, सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सौरऊर्जेचे उत्पादन घटल्याने वीजपुरवठ्यावर ताण वाढतो असं यावेळी सांगण्यात आलं आहे.