
मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरला अकोले ते मुंबई वाहन लॉंग मार्चचा इशारा
Massive march in support of the Satyagraha : अकोले : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत, पीकविम्याची नुकसान भरपाई, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे प्रोत्साहन अनुदान, कसणाऱ्यांच्या नावे जमिनी आणि बंद केलेले लाडक्या बहिणींचे मानधन पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांसाठी अकोले येथे गुरुवारी सुमारे सात हजार शेतकरी, शेतमजूर, कामगार व महिलांचा विराट मोर्चा (Massive march in support of the Satyagraha) काढण्यात आला. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआय यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक दिली.
अजित नवले यांनी सरकारच्या धोरणांवर टीका
त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ज्येष्ठ नेत्या वृंदा करात, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक धवळे आणि राष्ट्रीय संयुक्त सचिव डॉ. अजित नवले यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. राज्य सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची दुष्काळी मदत तुटपुंजी असून शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. पीकविम्याची संरक्षित रकमेनुसार भरपाई तातडीने द्यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे आणि वन, गायरान, वरकस व देवस्थान जमिनींसह प्रत्यक्ष कसणाऱ्यांच्या ताब्यातील जमिनी त्यांच्याच नावे कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
सभेत किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष सदाशिव साबळे, राज्य सहसचिव नामदेव भांगरे, कौन्सिल सदस्य ताराचंद विघे, तसेच एकनाथ मेंगाळ, गणेश ताजने, संगीता साळवे, हेमलता शेळके, निर्मला मांगे, मथुराबाई बर्डे, शिवराम लहामटे, राजू गंभीरे, दत्ता गोंदके, सुमन विरनक आणि अनिता साबळे यांनीही विचार मांडले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मागण्यांसाठी महामुक्काम सत्याग्रह सुरूच(Massive march in support of the Satyagraha)
दरम्यान, स्थानिक मागण्यांबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी, संगमनेरचे प्रांताधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांसोबत सुमारे तीन तास बैठक झाली. या बैठकीत स्थानिक मागण्या मार्गी लावण्यात आल्याचे किसान सभेने सांगितले. मात्र, राज्यस्तरीय मागण्यांसाठी महामुक्काम सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहनांसह अकोले ते मुंबई राज्यव्यापी लॉंग मार्च काढण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला. अकोले येथील रात्रंदिवस महामुक्काम सत्याग्रह सुरूच राहणार आहे.


