नगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (Bhanudas Kotkar) यांचे आज (ता. २४) सकाळी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन (Passed away due to a heart attack) झाले. आज सकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने अहिल्यानगरमधील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोतकर यांचा जीवनप्रवास (The Life Journey of Kotkar) जितका राजकीय वैभवाने नटलेला होता, तितकाच तो वादळवाटा, गुन्हेगारी खटले आणि अफाट व्यावसायिक साम्राज्यामुळे चर्चेत राहिला. सत्ता, पैसा आणि वाद या त्रिसूत्रीभोवती फिरणाऱ्या भानुदास कोतकरांच्या जीवन आणि कारकिर्दीचा सविस्तर परिचय आपण पाहू…
नक्की वाचा : राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी कधीपासून आणि किती दिवस असणार?
राजकीय कारकीर्द आणि महत्त्वाची पदे (Bhanudas Kotkar)

भानुदास कोतकर हे अहिल्यानगर जिल्हा आणि प्रामुख्याने केडगाव भागातील एक अत्यंत प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. या बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर आपली राजकीय पकड घट्ट केली. केडगाव ग्रामपंचायत असल्यापासून या भागात त्यांची पकड होती. पुढे महापालिकेत समावेश झाल्यानंतरही त्यांनी दीर्घकाळ पकड बजबूत ठेवली. या भागात दबदबा निर्माण करताना त्यांनी कामेही केली. केडगावची पाणी योजना होण्यातही कोतकर कुटुंबाचा वाटा आहे.
भानुदास कोतकर हे मूळचे काँग्रेस पक्षाचे खंदे नेते होते आणि त्यांनी अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले होते. मात्र, पक्षापेक्षा त्यांची स्थानिक पातळीवरील ‘कोतकर गट’ ही ताकद अधिक मोठी होती. कोतकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. नगर पंचायत समितीचे सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकारणासोबतच उद्योग क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले. ते संदीप उद्योग समूहाचे संस्थापक होते.
अवश्य वाचा : साईचरणी गुप्त दात्याकडून २७ लाखांची अनमोल भेट; संगमरवरी शिळांवर सोन्याच्या कोटिंगमध्ये कोरली साईबाबांची ११ वचने
भानुदास एकनाथ कोतकर यांचे जीवन आणि त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे सत्ता, अफाट व्यावसायिक यश आणि तितकाच गडद गुन्हेगारी इतिहास यांचा एक गुंतागुंतीचा पट होता. स्थानिक पातळीवर एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात करून अहिल्यानगरच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि पुढील तीन दशके केडगाव परिसरावर निर्विवाद वर्चस्व गाजवणे, ही त्यांची राजकीय ताकद दाखवून देणारी बाब होती. जिल्ह्याच्या राजकारणाची अनेक समीकरणे त्यांनी बदलली आणि कौटुंबिक जोडण्यांच्या माध्यमातून सत्तेची गणिते आपल्याच भोवती केंद्रित ठेवली. भानुदास कोतकरांनी स्वतः थेट मोठ्या निवडणुका न लढवता किंगमेकरची भूमिका बजावली होती. त्यांचे चिरंजीव संदीप कोतकर हे नगरचे महापौर बनले. राजकीय सोयीनुसार त्यांनी अन्य दिग्गज राजकीय घराण्यांशी कौटुंबिक नातेसंबंध जोडले. जगताप आणि कर्डिले यांच्याशी त्यांची सोयरिक झाली. त्यामुळे केडगाव आणि नगर शहराच्या राजकारणात या तीन घराण्यांची एकछत्री सत्ता निर्माण झाली.
राजकारणासोबतच भानुदास कोतकर आणि त्यांच्या पुत्रांनी अहिल्यानगर तसेच पुणे परिसरात मोठे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. कोतकरांचा ‘संदीप-सचिन’ हा प्रसिद्ध हॉटेल उद्योग समूह आहे, ज्या अंतर्गत ‘हॉटेल संदीप’, ‘हॉटेल सचिन’, ‘संदीप प्राईड’ आणि ‘हॉटेल उदयनराजे’ यांसारखी मोठी हॉटेल्स चालवली जातात. याशिवाय बांधकाम क्षेत्रातही त्यांची गुंतवणूक आहे. मात्र निधनाच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी, ऑक्टोबर २०२६ च्या मध्यातच, आयकर विभागाने कोतकरांच्या केडगावमधील निवासस्थानासह पुणे आणि नगरमधील त्यांच्या हॉटेल्सवर एकाच वेळी छापे टाकले. ही कारवाई तब्बल १२ तासांपेक्षा जास्त काळ सुरू होती. प्रत्यक्षात पथकांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र यामुळे कोतकर यांचे व्यावसायिक व्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यांनी खरेदी केलेल्या दोन हेलिकॉप्टरचीही चर्चा रंगली होती.
अशोक लांडे हत्या प्रकरण आणि न्यायालयीन लढाई (Bhanudas Kotkar)
कोतकर यांचे नाव जेवढे राजकारणासाठी घेतले गेले, त्यासोबतच दुर्दैवाने ते गुन्हेगारी खटल्यांमुळेही गाजले. व्यावसायिक स्पर्धेतून आणि राजकीय वैमनस्यातून घडलेली अशोक लांडे हत्येसारखी खळबळजनक प्रकरणे कोतकरांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी ठरली. या हत्येप्रकरणी भानुदास कोतकर, त्यांचे तीन मुले यांच्यासह इतर आरोपींवर खटला भरण्यात आला होता. १२ महत्त्वाचे साक्षीदार फितूर होऊनही ठोस पुराव्यांच्या आधारे नाशिकच्या विशेष सत्र न्यायालयाने भानुदास कोतकर आणि त्यांच्या तीनही मुलांना जन्मठेपेची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा खटला अजूनही वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. यात प्रकृतीच्या कारणास्तव भानुदास कोतकर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. केडगावमध्ये झालेलं दुहेरी हत्याकांड सुद्धा चर्चेत राहिलं.
२०१८ मध्ये महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वादातून केडगाव येथे शिवसेना नेते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक दुहेरी हत्याकांडातही भानुदास कोतकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कट रचल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेरच्या टप्प्यात मिळालेली जन्मठेपेची शिक्षा, जिल्हाबंदीची नामुष्की आणि आरोग्याच्या सातत्याच्या तक्रारींमुळे त्यांचे वैभवशाली आणि धाकयुक्त आयुष्य न्यायालयीन लढाईच्या चौकटीत अडकून पडले. निधनाच्या अवघ्या काही दिवस आधी पडलेले आयकर विभागाचे छापे हे त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला लागलेले ग्रहण ठरले.आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या वर्ष दीड वर्षात नगरशी संबंधित तीन दिग्गज नेते आणि एकमेकांचे सोयरे काळाच्या पडद्याआड गेलेत. माजी आमदार अरुणकाका जगताप त्यानंतर आमदार शिवाजीराव कर्डिले व आता भानुदास कोतकर. एकेकाळी या तिघांचाही अहिल्यानगर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात तिघांचाही दबदबा होता. आता तिघेही पडद्याआड गेल्याने एक राजकीय पोकळी निर्माण झाल्याची भावना या भागातून व्यक्त होत आहे.



