
District Bank Elections : कर्जत : विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दिलेले उमेदवार मंजुषा गुंड आणि अजिनाथ हजारे यांनी सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank Elections) आम्हास मतदान करू नये, या आशयाचे निवेदन सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करीत ऐनवेळी माघार घेतली. राम शिंदे यांनी जिल्हा बँकेत शेवटच्या दिवशी चार उमेदवारांची नावे जाहीर करून जिल्ह्याच्या राजकारणात विखे-थोरात गटाबरोबर पंगा घेतला होता. मात्र आता त्यांच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेत त्यांचीच कोंडी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नक्की वाचा : नगर-पुणे महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शेवटच्या घडीला उमेदवारी अर्ज माघारी
यंदाच्या जिल्हा बँक निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी लक्ष घालत सहकार क्षेत्रात प्रस्थापित असणारे विखे आणि थोरात गटास शह देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या घडीला त्यांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे ठरवले. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या काळापर्यंत जिल्हयातील सहकार क्षेत्रातील मातब्बर नेत्यांनी बिनविरोध निवडीची प्रक्रिया सुरू ठेवली. परंतु २१ ऑक्टोबर रोजी राम शिंदेंनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील चार उमेदवारांच्या नावाची घोषणा करीत त्या बिनविरोध निवडणुकीस खोडा घातला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
घुमरे यांची निवड बिनविरोध करण्यात राम शिंदेंना यश (District Bank Elections)
विशेष म्हणजे राम शिंदेंनी सेवा सोसायटी मतदारसंघातून कर्जतसाठी ज्योती शिंदे, जामखेडचे सचिन घुमरे, महिला राखीव मतदारसंघासाठी मंजुषा गुंड तर ओबीसी गटातून अजिनाथ हजारे यांचे नाव स्वताच्या सोशल खात्यावरून जाहीर केले. यासाठी त्यांनी अगोदरच जिल्हा बँकेचे मतदारांना सहलीसाठी राज्याबाहेर नेले होते. जामखेडचे सचिन घुमरे यांची निवड बिनविरोध करण्यात राम शिंदेंना यश मिळाले. त्यांनी आपल्या एका समर्थकाचे जिल्हा बँकेच्या राजकारणात पदार्पण देखील करवून घेतले. मात्र इतर तिन्ही उमेदवारांसाठी विखे-थोरात गटांशी उघडपणे पंगा घेत विरोधी भूमिका पुढे आणली. मात्र शुक्रवारी मंजुषा गुंड आणि अजिनाथ हजारे यांनी ऐनवेळी आपल्या गटातून माघार घेण्याचे सूतोवाच केल्याचे भाजपाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांने सांगितले.
वरील घटनेबाबत दुजोरा
सोमवारी जिल्हा बँकेची निवडणुक मतदान प्रक्रिया पार पडणार असून महिला गटातील राम शिंदे समर्थक मंजुषा गुंड आणि ओबीसी गटाचे अजिनाथ हजारे यांनी आपणांस कोणत्याही जिल्हा बँकेच्या मतदारांनी मतदान करू नये. आपले मत इतर उमेदवारांना द्यावे असे निवेदन केल्याचे समजते. याबाबत राम शिंदेंच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी वरील घटनेबाबत दुजोरा दिला असून जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतून राम शिंदे यांच्या पॅनलच्या गुंड आणि हजारे यांनी माघार घेतल्याचे शिक्कामोर्तब केले. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज न भरणारे राम शिंदे या दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी अचानक घेतलेल्या यु टर्नने राजकीय क्षेत्रात विरोधकांच्या रडारवर आले आहेत.
ज्योती शिंदे-तुषार पिसाळांमध्ये लढत… मंगळवारी कोण मारणार बाजी ? जिल्ह्याचे लागले लक्ष
राम शिंदे यांनी जिल्हा बँकेसाठी आपल्या पॅनलचे चार उमेदवार जाहीर करीत बिनविरोध निवडीला खो दिला होता. जामखेडची सेवा-सोसायटी जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश आले. मात्र शुक्रवारी गुंड-हजारेंनी माघार घेत त्यांना अडचणीत आणले. आता सोमवारी जिल्हा बँकेच्या मतदान प्रक्रियेत राम शिंदे समर्थक ज्योती शिंदे यांचा सामना विखे समर्थक तुषार पिसाळांबरोबर रंगणार आहे. यात कोण बाजी मारेल ? याबाबत कर्जतमध्ये अनेकांनी पैंजा लावल्या असून राम शिंदेंसह विखे पिता-पुत्र आणि माजी संचालक अंबादास पिसाळ यांची कसोटी पहावयास मिळणार आहे.


