
Gang Apprehended : नगर : मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात फरार असलेले आरोपी पुन्हा नगर-पुणे महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) कारवाई करत चौघांना ताब्यात (Taken into Custody) घेतले. या कारवाईत तीन दुचाकी, दोन चाकू, एक घड्याळ आणि एक गलोर असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर सहा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
नक्की वाचा : सर्व शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळी मदत द्या; शिवसेनेची मागणी
वाहनांची वाट अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत
ही कारवाई २९ ऑक्टोबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चास गावच्या शिवारात करण्यात आली. सुशांत सुरेश भोसले (वय २३, रा. पिंपळगाव कवडा, ता. अहिल्यानगर), वैभव किरण भोसले (वय २६, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले (वय २३, रा. पिंपळगाव कवडा) आणि राम उर्फ बोकड्या उर्फ बठ्या लखन काळे (वय १९, रा. कामरगाव, ता. अहिल्यानगर) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नगर-पुणे महामार्गावरील चास घाटाच्या वरच्या बाजूला भारतीय सैन्य दलाच्या वाय आकाराच्या चिन्हाजवळ ८ ते १० जण धारदार शस्त्रे आणि गलोर घेऊन वाहनांची वाट अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पळून जाण्याचा प्रयत्न (Gang Apprehended)
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले होते. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला. यावेळी तीन दुचाकींवर आलेले दहा जण शस्त्रांसह दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चौघांना पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुशांत सुरेश भोसले (वय २३, रा. पिंपळगाव कवडा, ता. अहिल्यानगर), वैभव किरण भोसले (वय २६, रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड), अविनाश सावंत उर्फ सावत्या भोसले (वय २३, रा. पिंपळगाव कवडा) आणि राम उर्फ बोकड्या उर्फ बठ्या लखन काळे (वय १९, रा. कामरगाव, ता. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
संबंधित गुन्ह्यांचा तपास सुरू
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता जाक्या संजय काळे, आवेश मिरफा भोसले, जयपाल संजय काळे, प्रथमेश मिरफा भोसले, परमेश मिरफा भोसले आणि तुषार सावत्या भोसले हे सहा जण पळून गेल्याची माहिती समोर आली.चौकशीत सुशांत भोसले याने साथीदारांसह चास-कामरगाव शिवारातील घाट परिसरात नगर-पुणे महामार्गावर यापूर्वी पाच ते सहा वाहनांना अडवून प्रवाशांना मारहाण करत चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे संबंधित गुन्ह्यांचा तपास सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या सुशांत भोसले, अविनाश भोसले आणि राम काळे यांच्यासह फरार तुषार भोसले यांच्याविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेले आरोपी यापूर्वीही दरोडा, जबरी चोरी, मारहाण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


