Pathardi News :पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे (Drought conditions) शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop damage) झाले असून, शेतीचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावी. मदत वाटप करताना कोणत्याही प्रकारचे जाचक निकष लावू नयेत तसेच अनावश्यक कागदपत्रांची अट घालू नये, अशी मागणी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांनी केली आहे.
नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संजीवनी सैनिकी स्कूलचा ‘राष्ट्रीय नाद’ घुमणार
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दैनंदिन खर्च भागविणेही कठीण
यासंदर्भात त्यांनी तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब धस, राजू सोनटक्के, विकास मोरे, फुलचंद चिमटे, अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, नागनाथ गर्जे आदी उपस्थित होते. दुष्काळाच्या झळा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना बसल्या असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली मदत प्रत्यक्षात प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेतकऱ्यांसाठी मोठा आधार (Pathardi News)
भगवान दराडे म्हणाले, यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्नाऐवजी कर्ज आणि संकटे आली आहेत. पिके हातची गेली, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शासनाची आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. मात्र, मदत वाटपात किचकट निकष आणि कागदपत्रांच्या अटी लावल्यास अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करावी.
विशेषतः सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देऊन त्यांची दिवाळी सुसह्य करावी.दुष्काळी मदतीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेऊन मदत वाटपाची प्रक्रिया सुलभ करावी, अशी अपेक्षाही शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.



