Sonia Gandhi’s Autobiography: अण्णा हजारे यांच्या आंदोलनाआडूनच नरेंद्र मोदी भाजपचा राष्ट्रीय चेहरा बनले; सोनिया गांधी यांचा आत्मचरित्रात दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख

0

Sonia Gandhi’s Autobiography: नगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोध जनआंदोलनाचा संबंधी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडून सतत आरोप केले जातात. आता असाच आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही केला आहे. गांधी यांनी त्यांच्या ‘बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Sonia Gandhi’s Autobiography) या आत्मचरित्रात हा आरोप नव्याने करताना त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला आहे. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे हजारे यांच्या या आंदोलनामुळेच राष्ट्रीय चेहरा म्हणून पुढे आले, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे.

नक्की वाचा : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय

आंदोलनामुळे काँग्रेस आघाडीचे सरकार बॅकफूटवर

अण्णा हजारे यांच्या आंदोलनासंबंधी आपल्या पु्स्तकात सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, २०१२ मधील गाजलेले ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ हे आंदोलन हे अनाहूत नसून, ते पडद्यामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुप्तपणे आयोजित केले होते. लोकपाल विधेयकाची व्यापक अधिकारांसह नेमणूक करण्याची मागणी करत उपोषण सुरू करण्यासाठी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कार्यकर्ते अण्णा हजारे यांना मोठा गाजावजा करीत दिल्लीत आणले गेले होते. या आंदोलनामुळे प्रचंड जनक्षोभ उसळला आणि भाजपच्या आक्रमक प्रचाराचा मुकाबला करताना तत्कालीन काँग्रेस आघाडीचे सरकार पूर्णपणे बॅकफूटवर फेकले गेले.
या आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख व्यक्तींनी नंतर असे कबूल केले आहे की, हे संपूर्ण आंदोलन गुप्तपणे भाजप आणि आरएसएसद्वारे आयोजित केले आणि चालविले गेले होते. लोकपाल बिल २०१४ मध्ये आणले गेले, त्यानुसार केंद्रीय स्तरावर लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्तांना सार्वजनिक अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार दिले. परंतु, भाजपच्या राजवटीत हे विधेयक आणि व्यवस्था पुरती निष्प्रभ ठरली. विरोधकांचे मूळ उद्दिष्ट सरकार उलथवून टाकण्याचे साध्य झाल्यानंतर, त्यानंतर अण्णा हजारे यांच्याबद्दल किंवा त्या आंदोलनाबद्दल पुन्हा कधीही फारसे ऐकायला किंवा वाचायला मिळाले नाही, असेही सोनिया गांधी यांनी या पुस्तकार म्हटले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ऐतिहासिक आंदोलनावर पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता

नरेंद्र मोदींच्या आगमनाची पायाभरणी याच आंदोलानातून झाली, असा दावा करताना सोनिया गांधी यांनी म्हटले आहे की, हजारे यांचे हे आंदोलन सुरू असताना पडद्यामागे आरएसएस एका नव्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या आगमनाची पायाभरणी करत होते. तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. लहानपणापासून संघप्रणालीत वाढलेले आणि विचारसरणीबद्दल कटिबद्ध असलेले मोदी त्यांच्या संघटन कौशल्यामुळे प्रमुख पदावर आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा एक खमके राजकारणी अशी बनली होती, आणि त्यांच्या या तीव्र प्रचार मोहिमेमुळे ते एका राष्ट्रीय नेत्याच्या रूपात प्रकाशझोतात आले, असे गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे.सोनिया गांधी यांच्या या दाव्यामुळे आता हजारे यांच्या त्या ऐतिहासिक आंदोलनावर पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. यावर स्वतः हजारे किंवा त्यांच्या समर्थकांकडून अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here