Instagram Meta Content Policy : इन्स्टाग्रामवर आता अश्लील अन् हिंसक कंटेंटला चाप! मेटाकडून नियमांत मोठे बदल

0
Instagram Meta Content Policy : इन्स्टाग्रामवर आता अश्लील अन् हिंसक कंटेंटला चाप! मेटाकडून नियमांत मोठे बदल

नगर : इन्स्टाग्रामवर रील्स स्क्रोल (Instagram Meta Content Policy) करताना किंवा पोस्ट पाहताना अनेकदा आपल्यासमोर नको असलेला अश्लील किंवा हिंसक कंटेंट (Obscene or violent content) समोर येतो. मात्र अशा कंटेंटपासून युजर्सची सुटका करण्यासाठी मेटाने (Meta) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतातील इन्स्टाग्राम युजर्सना लैंगिकदृष्ट्या सूचक आणि हिंसक स्वरूपाच्या पोस्ट कमी प्रमाणात दिसाव्यात, यासाठी कंपनीने आपल्या कंटेंट रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल केले आहेत. विशेष म्हणजे, नको असलेला कंटेंट युजर्सपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ओळखण्यासाठी अधिक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेल्सची मदत घेतली जाणार आहे. मात्र अशा पोस्ट डिलीट केल्या जाणार नाहीत.

नक्की वाचा : थंडी-उन्हाच्या खेळात ‘अक्वान’ चक्रीवादळाची एन्ट्री! महाराष्ट्रात हवामान बदलणार का?

बदललेले नियम काय? (Instagram Meta Content Policy)

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, हे बदल भारतातील युजर्सने फॉलो न केलेल्या अकाउंट्सवरील शिफारस केलेल्या पोस्टसाठी लागू असतील. इन्स्टाग्रामच्या रील्स, एक्सप्लोर आणि फीड या तिन्ही विभागांमध्ये आता अशा कंटेंटच्या शिफारशी कमी केल्या जाणार आहेत. म्हणजेच, युजर्सने स्वतःहून फॉलो न केलेल्या अकाउंट्सवरील आक्षेपार्ह पोस्ट त्यांच्या फीडमध्ये दिसण्याचे प्रमाण कमी होईल. या बदलांचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रगत एआय मॉडेल्सचा वापर. ही मॉडेल्स इन्स्टाग्रामच्या कंटेंट शिफारस मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोस्टचे मूल्यांकन करतील. त्यामुळे युजर्सने एखादी पोस्ट रिपोर्ट करण्याची किंवा लपवण्याची वाट न पाहता संभाव्य आक्षेपार्ह कंटेंट आधीच ओळखता येईल. अशा पोस्टचा प्रसार मर्यादित करण्यावर कंपनीचा भर आहे.

अवश्य वाचा : स्कूल ॲडमिशनच्या नावाखाली होणारी लूट थांबणार; ‘या’ नियमांचं उल्लंघन केल्यास शाळांवर कारवाई!

भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंटेंट शिफारस प्रणालीवर नियामक संस्थांचे लक्ष वाढले आहे. १० ऑक्टोबरला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या पोस्ट दाखविण्याच्या पद्धतीचा आढावा घेण्यास सांगितले होते. दिशाभूल करणारा, बदल केलेला किंवा चुकीच्या संदर्भातला मजकूर अधिक लोकांपर्यंत पोहोचू नये, अशी सूचनाही मंत्रालयाने केली होती. मात्र, इन्स्टाग्राममधील सध्याचे बदल या सरकारी सूचनांशी संबंधित आहेत की नाहीत, याबाबत मेटाने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

इन्स्टाग्रामच्या कंटेंट शिफारस प्रणालीचे नियम आणि कम्युनिटी स्टँडर्ड्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कम्युनिटी स्टँडर्ड्सचे उल्लंघन करणाऱ्या पोस्ट प्लॅटफॉर्मवरून हटवल्या जातात. मात्र, काही पोस्ट संवेदनशील किंवा आक्षेपार्ह असल्या, तरी त्या नियमांचे उल्लंघन करत नसतील तर त्या इन्स्टाग्रामवर उपलब्ध राहू शकतात. अशा पोस्ट युजर्सना मोठ्या प्रमाणावर सुचवल्या जाणार नाहीत. म्हणजेच, मेटाने अशा सर्व कंटेंटवर बंदी घातलेली नाही. तर युजर्सपर्यंत त्याचा प्रसार कमी करण्यासाठी रिकमेंडेशन सिस्टीममध्ये सुधारणा केली आहे.

युजर्सनाही मिळणार कंटेंटवर नियंत्रण ठेवण्याचे पर्याय (Instagram Meta Content Policy)

इन्स्टाग्रामवर केवळ कंपनीच्या स्तरावरच नव्हे, तर युजर्सनाही स्वतःच्या आवडीनुसार कंटेंट नियंत्रित करण्यासाठी काही सुविधा देण्यात आल्या आहेत.

१. सेन्सिटिव्ह कंटेंट कंट्रोल : या सुविधेमुळे युजर्सना संवेदनशील कंटेंट कमी प्रमाणात पाहण्याचा पर्याय निवडता येतो. याचा परिणाम सर्च, रील्स, एक्सप्लोर, सुचवलेली अकाउंट्स आणि फीडमधील शिफारसींवर होतो.

२. नॉट इंटरेस्टेड : एखादी पोस्ट आवडली नाही किंवा ती पुन्हा पाहायची नसेल, तर हा पर्याय निवडून इन्स्टाग्रामला त्याबाबत कळवता येते.

३. हिडन वर्ड्स : या सुविधेमुळे कमेंट्स आणि मेसेज रिक्वेस्टमधील निवडक शब्द, वाक्ये आणि इमोजी फिल्टर करता येतात.

४. ब्लॉक सुविधा : एखाद्या विशिष्ट अकाउंटला आपले प्रोफाइल शोधण्यापासून, पोस्ट पाहण्यापासून किंवा मेसेज पाठवण्यापासून रोखता येते. संबंधित व्यक्तीने नवीन अकाउंट तयार केले तरी त्यावरही निर्बंध लागू होऊ शकतात.

आता कमी वयाच्या युजर्ससाठी इन्स्टाग्रामने ‘टीन अकाउंट्स’ ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतात गेल्या वर्षी सुरू झालेल्या या सुविधेमध्ये किशोरवयीन मुलांसाठी वयानुसार अतिरिक्त सुरक्षा उपाय आहेत. यामध्ये १३ वर्षे आणि त्यावरील वयोगटाला अनुरूप कंटेंट सेटिंग आपोआप लागू होते. त्यामुळे तरुण युजर्सना संभाव्य हानिकारक कंटेंटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. युजर्सच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कंटेंट शिफारस प्रणालीत पुढेही सुधारणा केल्या जातील, असे मेटाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात इन्स्टाग्रामवर कोणत्या प्रकारच्या पोस्ट आणि रील्स दिसतात, हेच पाहणे महत्वाचे ठरेल.