
Drought : नगर : कर्जत-जामखेड मतदारसंघात दुष्काळाची (Drought) तीव्रता वाढत असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत कर्जत तालुक्यात मंजूर झालेल्या डेपोला विरोध केला जात असल्याचा आरोप करत, हा डेपो लवकर सुरू झाला नाही तर मोठे आंदोलन उभारू, असा आक्रमक इशारा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिला. सरकार केवळ घोषणा करते; प्रत्यक्ष मदत देण्याची वेळ आली की हात आखडता घेते, अशी टीकाही त्यांनी केली.
कर्जत-जामखेडमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर
सुरत-चेन्नई महामार्गाच्या कामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीसाठी आले असताना रोहित पवार यांनी विविध प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधला. कर्जत-जामखेडमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी होत आहे. मात्र, सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदतही अद्याप ६० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. सरकार बोलते मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाही, असा घणाघात पवार यांनी केला. जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच चारा छावण्या सुरू कराव्यात. अन्यथा सरकारविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दुष्काळाच्या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत(Drought)
कर्जत-जामखेड मतदारसंघात सुमारे २८ हजार कांदा उत्पादक शेतकरी आहेत. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच आपण संघर्ष करत असल्याचे सांगत, आगामी काळात दुष्काळाच्या प्रश्नावर मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत त्यांनी दिले.
जामखेड शहराच्या पाणीप्रश्नावर बोलताना रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जामखेडच्या पिण्याच्या पाण्यासाठी १६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र, सत्ता बदलल्यानंतर ही योजना रखडली. काही लोक आमदार आणि सभापती झाले; मात्र जनतेच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. ही योजना वेळेत पूर्ण झाली असती तर आज जामखेडकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता, असा आरोप त्यांनी केला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली असून, पुढील दोन महिन्यांत ही योजना मार्गी लावावी, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सभापती राम शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. २०-२२ दिवस फिरायला जाता, मात्र त्याचा आपल्या मतदारसंघाला आणि राज्याला काय फायदा झाला, असा सवाल करत त्यांनी राम शिंदेंना टोला लगावला.
डिंभे-माणिकडोह प्रकल्पावर अधिवेशनात आवाज उठवणार
डिंभे-माणिकडोह प्रकल्पाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याबाबत विचारले असता, सरकारकडून अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार असून, त्यानंतर आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करू, असे पवार यांनी सांगितले. एक डिसेंबर रोजी कृती समितीच्या माध्यमातून होणाऱ्या आंदोलनाबाबत विचारले असता, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर त्यांच्यासोबत राहण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यांवर अन्याय होऊ नये, ही तेथील शेतकऱ्यांची भावना आहे. मात्र, या प्रश्नात राजकारण केले जात असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदारसंघ फोडण्याचा डाव खपवून घेणार नाही!
महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी भूमिका मांडली. लोकसभा मतदारसंघांची ५० टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत काहींनी अनुकूल भूमिका घेतली असली, तरी मतदारसंघांची पुनर्रचना कोणत्या पद्धतीने केली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे. आसाममध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघांची पुनर्रचना झाली, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना संविधानाच्या चौकटीत आणि पारदर्शक पद्धतीने होत असेल तर आमचा विरोध नाही. मात्र, संपूर्ण प्रक्रिया भाजपच्या नियंत्रणाखाली असेल तर ते मान्य होणार नाही. मतदारसंघ पुनर्रचना समितीमध्ये विरोधी पक्षनेत्याला स्थान मिळाले पाहिजे. निवडणूक आयोगाचा प्रमुख सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. नगरपालिकांमध्ये जसे प्रभाग फोडले जातात, त्याच पद्धतीने लोकसभेचे मतदारसंघ फोडण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
अजितदादांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच !
अजित पवार यांना न्याय मिळावा, यासाठी आपण आपली भूमिका ठामपणे मांडत असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. एखाद्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र धर्म आणि संविधान टिकविण्यासाठी आपला लढा सुरू आहे. अजितदादांना न्याय मिळावा, ही आपली भूमिका असून राज्यातील जनता या भूमिकेसोबत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विलिनीकरण होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टीका, पुतळे जाळणे किंवा अन्य विरोध झाला तरी आपला संघर्ष थांबणार नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिले असून, व्ही. के. सिंग यांना देशाबाहेर जाऊ देऊ नये, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपकडून मीडिया ट्रायलचा प्रयत्न!
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावर बोलताना संबंधितांनी माफी मागितल्याचे पवार म्हणाले. भाजपने संबंधितांना हाताशी धरून मीडिया ट्रायल सुरू केली असून, आमच्या पत्रकार परिषदेला प्रसिद्धी मिळू नये, यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा स्पष्ट इशारा रोहित पवार यांनी दिला.


