
शाळा बंद करण्यास स्थगिती देऊन ‘हेरिटेज बेस्ड मॉडेल स्कूल’ करण्याची मागणी; डॉ.पंकज आशिया व आनंद भंडारी यांचा सकारात्मक प्रतिसाद
Savitribai Phule : अहिल्यानगर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या अध्यापनाच्या प्रशिक्षणाशी व प्रेरणेशी संबंधित मिस् सिंथिया फॅरार (Miss Cynthia Farrar) यांच्या ऐतिहासिक शैक्षणिक कार्याचा वारसा असलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल फॉर गर्ल्स (Clara Bruce High School for Girls) आणि अहमदनगर बोर्डिंग हायस्कूल (Ahmednagar Boarding High School) या दोन ऐतिहासिक शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देऊन त्यांचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी ‘मिस् सिंथिया फॅरार शाळा बचाव अभियान’च्या वतीने करण्यात आली.
‘मॉडेल स्कूल’मध्ये रूपांतर करण्याची मागणी
महात्मा जोतिराव फुले यांच्या जन्माचे द्विशताब्दी वर्ष साजरे करत असताना या शाळांचे ‘मॉडेल स्कूल’मध्ये रूपांतर करावे, अशी मागणीही करण्यात आली.बुधवारी ता. २५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड तसेच मराठी मिशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
१८३८ मध्ये मुलींसाठी शाळेची स्थापना (Savitribai Phule)
अमेरिकन मराठी मिशनने १८२८ मध्ये महाराष्ट्रात शैक्षणिक कार्य सुरू केले. १८३८ मध्ये मुलींसाठी शाळेची स्थापना करण्यात आली. तत्कालीन अहमदनगरमध्ये मिस् सिंथिया फॅरार यांनी शिक्षणप्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुढे १८८२ मध्ये अहमदनगर बोर्डिंग हायस्कूलची स्थापना झाली. या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षण आणि आधुनिक शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने मिस् सिंथिया फॅरार यांच्या कबरीचा शोध घेतल्याने या ऐतिहासिक वारशाच्या जतनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला.
दोन्ही शाळांमधील शिक्षकांची कमतरता, शिक्षक समायोजन, वेतनाचे प्रश्न, विद्यार्थिसंख्या घटणे आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे शाळांची अवस्था खालावल्याचा आरोप अभियानाने केला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक कागदपत्रांची पडताळणी, प्रलंबित वेतन व भत्ते निकाली काढणे आणि आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, शिक्षकांचे प्रश्न आणि पुनरुज्जीवनाची शक्यता विचारात घ्यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, पोषण, डिजिटल शिक्षण आणि कौशल्यविकासाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
या ऐतिहासिक शाळांचे ‘हेरिटेज बेस्ड मॉडेल स्कूल’मध्ये रूपांतर करून इमारतींचे जतन, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था विकसित करावी. तसेच मिस् सिंथिया फॅरार, सावित्रीबाई फुले व स्त्रीशिक्षणाच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ऐतिहासिक माहिती केंद्र किंवा संग्रहालय उभारावे. यासाठी माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि सीएसआर निधीचा सहभाग घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. शाळांचे पुनरुज्जीवन न झाल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशाराही अभियानाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी रेव्ह. जी.आर. वाघमारे, माजी विद्यार्थीनी संध्या मेढे, निवृत्त समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, इतिहासप्रेमी मंडळाचे भैरवनाथ वाकळे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, आसिफखान दूलेखान, बॉईज हायस्कूलचे माजी विद्यार्थी जफर खान, अजय सूर्यवंशी, डी.डी. सोनवणे, राजू देठे, सुनील बनसोडे, फिरोज शेख, विशाल केदारे, दीपाली कांबळे, स्मिता नाईक, विजय काकडे, अर्पा साळवे, सीमा जाधव, राणी पातारे, किरण कटारिया, पंकज गुंदेचा, डॉ. महेश पाटोळे, विजय कर्डक, सॅम नाईक, अनिल नेटके, राहुल वैराळ, एज्रा फाउंडेशनचे सेवक यांसह मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.


