National Interest Promotion Board | नगर : दातृत्व हा अंगभूत गुण आहे, त्याचा आर्थिक परिस्थितीशी संबंध नसतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इस्टेट शून्य आहे. सद्गुणी नागरिक निर्माण करणे हे काम संघ करतो, हीच संघाची इस्टेट, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. अहिल्यानगर येथील राष्ट्रहित संवर्धक मंडळाने ( National Interest Promotion Board ) आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगरचे प्रसिद्ध उद्योजक चिन्मयजी सुखटणकर हे होते तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक सुरेश जाधव तसेच महापौर ज्योती गाडे हे उपस्थित होत्या.
कार्यक्रम उत्साहात ( National Interest Promotion Board )
अहिल्यानगर मधील श्रीमती. पुंड आणि श्रीमती. नवांगुळे या दोन मातृशक्तींनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या सावेडी भागातील जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘राष्ट्रहित संवर्धक मंडळास’ उदार अंतःकरणाने दान केल्या. त्याबद्दल, राष्ट्रहित संवर्धक मंडळाने कृतज्ञ भावनेने श्रीमती. पुंड व श्रीमती. नवांगुळे यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. सावेडी भागातील गुलमोहर रोड, कलानगर चौका जवळील राणी लक्ष्मीबाई सभागृहाच्या प्रांगणात हा कार्यक्रम रविवारी (ता. २२) सायंकाळी झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
हीच संघाची खरी इस्टेट ( National Interest Promotion Board )
भारतमाता पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सुहासराव हिरेमठ बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले संघाची इस्टेट शून्य आहे. सद्गुणी नागरिक निर्माण करणे हे काम संघ करतो, हीच संघाची खरी इस्टेट आहे. कार्यकर्त्यांच्या आधारावर संघ देशात दीड लाखांपेक्षा जास्त सेवा कार्य चालवतो, मात्र ही संख्या गरजेपेक्षा खूप कमी आहे.
दातृत्व हा गुण ( National Interest Promotion Board )
समाजातला एक वर्ग दुर्बल राहणं, हे सर्वांच अपयश आहे. अशा गरजू बांधवांच्या उत्थानासाठी आपल्या वार्षिक मिळकतीतील विशिष्ट रक्कम सेवा कार्याला प्रत्येकाने घालायला हवी. आपण सर्व जण दाते आहोत, काही न काही दिल्याशिवाय या पृथ्वीतलावरून जाऊ नये. दातृत्व हा गुण आहे. याचा आर्थिक परिस्थितीशी संबंध नाही.

‘परमेश्वर’, हा जिथे सेवा कार्य चालते तिथे राहतो. म्हणून वर्षातून एकदा सेवा कार्य स्थळाला भेट द्यावी. बघण्याने जे समजतं, ते ऐकण्याने समजत नाही. स्वधर्माची करंसी पुण्य आहे. सर्व जगाला मार्ग दाखवण्याची जबाबदारी हिंदू समाजाची आहे. असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. अखिल भारतीय सेवाप्रमुख या दायित्वात असताना बंगलोर, सुरत अशा अनेक ठिकाणी अनुभवलेल्या गोष्टी अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने त्यांनी ओघवत्या शैलीत मांडल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी केलेली पुण्याची व्याख्या आणि माणसाची मरणोत्तर स्वर्गाच्या, देवाच्या प्रदेशातील करन्सी ही काय आहे हे ज्या पद्धतीने सांगितले त्यातून पुंडे ताई आणि नवांगुळे ताई यांचे स्वर्गद्वार आपोआप उघडले गेले आहे ह्याचे सुंदर विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रहित संवर्धक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा संघचालक वाल्मिकजी तथा पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी केले. मंडळाचे सचिव महेंद्रभाई चंदे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच मंडळाचे सदस्याचे हस्ते मान्यवरांचा आणि ज्यांनी आपली जागा राष्ट्रहित संवर्धक मंडळास दान दिली अशा श्रीमती. पुंड व नवांगुळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी सुखटणकर म्हणाले की, व्यक्ती निर्माणाचे संघाचे कार्य माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
एक उद्योग चालवताना कामगारांना वारंवार सूचना देऊन काम करून घ्यावे लागते. मात्र संघाचे अनेक कार्यकर्ते विविध संस्थात्मक कार्य खुबीने करतात ही बाब माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महापौर ज्योती गाडे यांनी मनोगतामध्ये दात्यांचे कौतुक केले. यावेळी श्रीमती. पुंडताई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझी जागा योग्य ठिकाणी दान केली याचे मला मनस्वी समाधान आहे.
आदित्य चांदकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर प्रशांत आढाव यांनी आभार व्यक्त केले. अॅड. शुभम वाघ यांनी वैयक्तिक गीत गायिले तर मंजुषा पाठक यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
अहिल्यानगर महापालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र गंधे तसेच विद्यमान नगरसेवक अॅड. ऋग्वेद गंधे यांचे विशेष योगदान या कार्यक्रमास लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रहित संवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष किशोर गांधी, सहसचिव उदयकुमार भणगे, खजिनदार सुजय पानसरे, कार्यकारी सदस्य डॉ. हर्षवर्धन तन्वर, स्वप्नील कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रमुख, जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव तसेच नगर शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंसेवक मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.



