Sugarcane Crushing | नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०२६-२७ चा ऊस गाळप ( Sugarcane Crushing ) हंगाम वेगाने सुरू असून, २४ नोव्हेंबरअखेर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी मिळून ४० लाख ४७ हजार ४८ टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून ३४ लाख ८८ हजार १४५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.६२ टक्के नोंदविण्यात आला आहे.
साखरेचे उत्पादन ( Sugarcane Crushing )
जिल्ह्यातील १२ सहकारी आणि नऊ खासगी अशा एकूण २१ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला आहे. सहकारी कारखान्यांनी आतापर्यंत २४ लाख ९३ हजार ४५७ टन उसाचे गाळप केले असून, त्यातून २१ लाख ६९ हजार ९१० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.७० टक्के आहे. दुसरीकडे, खासगी कारखान्यांनी १५ लाख ५३ हजार ५०१ टन उसाचे गाळप करून १३ लाख १८ हजार २३५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. खासगी कारखान्यांचा साखर उतारा ८.४९ टक्के नोंदविण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उसाचे गाळप ( Sugarcane Crushing )
गाळपाच्या बाबतीत प्रवरा परिसरातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने ३ लाख ९१ हजार ६८० टन उसाचे गाळप केले आहे. त्यापाठोपाठ गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शनने ३ लाख २९ हजार ४१० टन, तर मुळा सहकारी साखर कारखान्याने ३ लाख २३ हजार टन उसाचे गाळप केले आहे.
साखर उताऱ्याच्या बाबतीत बारामती ॲग्रो हादगाव सहकारी साखर कारखान्याने ९.६४ टक्क्यांसह आघाडी घेतली आहे. त्यानंतर साखर उताऱ्यात इतर काही कारखान्यांनीही चांगली कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांची एकूण दैनिक गाळप क्षमता ९९ हजार ४५० टन इतकी आहे. सहकारी कारखान्यांची क्षमता ५७ हजार ९५० टन, तर खासगी कारखान्यांची क्षमता ४१ हजार ५०० टन आहे. सध्या सुरू असलेल्या गाळप हंगामात सहकारी कारखान्यांनी खासगी कारखान्यांच्या तुलनेत अधिक गाळप आणि साखर उतारा नोंदवला आहे.
एकूणच, जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम वेग घेत असून, आगामी काळात उसाची उपलब्धता, गाळपाचा वेग आणि साखर उताऱ्यात किती वाढ होते, याकडे शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.



