
Student Assaulted By A Peon : नगर : शिक्षणासाठी वसतिगृहात (Hostel) राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला चक्क घरकाम करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नकार दिल्याने काठीने मारहाण (Assaul) केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. श्री संत गाडगे महाराज छात्रालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या तुकाराम विघ्ने यांच्याविरोधात १४ वर्षीय विद्यार्थ्याने कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्याशी होणाऱ्या वागणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात घट; जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार
विद्यार्थ्याला अश्लील शिवीगाळ
तक्रारीनुसार, संबंधित विद्यार्थी गेल्या चार वर्षांपासून श्री संत गाडगे महाराज छात्रालयात राहून राष्ट्रीय पाठशाला हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. वसतिगृहात सुमारे १२० विद्यार्थी राहतात. शिपाई तुकाराम विघ्ने हे विद्यार्थ्यांना त्रास देऊन त्यांच्याकडून घरची कामे करून घेत असल्याचा आरोप या विद्यार्थ्याने केला आहे. याबाबत यापूर्वी मुख्याध्यापकांकडेही तक्रार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळी साडेआठच्या सुमारास संबंधित विद्यार्थी वसतिगृहाच्या मैदानात पुस्तक घेऊन अभ्यास करत होता. त्यावेळी दोन विद्यार्थी हातगाडीमध्ये माती भरत असल्याचे पाहून त्याने त्यांना अभ्यासाला न आल्याबद्दल शिक्षकांकडे नाव सांगण्याचे म्हटले. त्यानंतर काही वेळातच शिपाई तुकाराम विघ्ने तेथे आले. त्यांनी विद्यार्थ्याला अश्लील शिवीगाळ करत हातात काठी घेऊन त्याच्याकडे धाव घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काठीने मारहाण (Student Assaulted By A Peon)
‘तुझा अभ्यास गेला उडत, हातगाडीने मातीच्या चार गाड्या भरून माझ्या घरासमोर टाक,’ असे सांगत त्यांनी काम करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘मला अभ्यास करायचा आहे, मी तुमचे काम करणार नाही,’ असे विद्यार्थ्याने स्पष्ट सांगितले. याचा राग आल्याने विघ्ने यांनी काठीने मारहाण केल्याचे विद्यार्थ्याने तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला अभ्यास करण्याऐवजी मातीच्या गाड्या भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या आरोपाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल केकाण करीत आहेत.


