Solapur News: फक्त २० ताटांवरून बिनसलं, सोलापुरात प्रतिष्ठित कुटुंबाचं लग्न ऐन मुहूर्तावर मोडलं;पोलिसांची मध्यस्थीही अपयशी

0
Solapur News: फक्त २० ताटांवरून बिनसलं, सोलापुरात प्रतिष्ठित कुटुंबाचं लग्न ऐन मुहूर्तावर मोडलं;पोलिसांची मध्यस्थीही अपयशी

नगर : हुंड्यामुळे लग्न मोडल्याचे आपण अनेकदा वाचले आहे. मात्र लग्नात २० ताटांचा खर्च वाढल्याने लग्न मोडलं असं क्वचित कधी ऐकलं असेल. लग्नाचा शाही थाट, सनई- चौघड्यांचे सूर, अवघ्या काही तासांत वधू-वर सप्तपदीचे सात फेरे घेऊन नव्या आयुष्याची सुरुवात करणार होते. मात्र, हळदीच्या जेवणावळीत वाढलेल्या अवघ्या २० ताटांच्या हिशोबाने संपूर्ण विवाह सोहळ्यावर विरजण पडले. ‘जास्त ताटांचे पैसे कोणी भरायचे?’ या शुल्लक वादाचे रूपांतर मोठ्या अहंकारात झाले की, अखेर हे गुरुवारी (ता.२६) दुपारी शुभमुहूर्तावर पडणाऱ्या अक्षता पडल्याच नाहीत आणि हे लग्न (The wedding was called off) मोडले. सोलापूर (Solapur News) शहरात ही घटना घडली आहे.

नक्की वाचा : पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरण : ५० हजारांची दिली सुपारी, एमपीतून पिस्तूल खरेदी आणि कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार!

जेवणाची पंगत सुरु होताच वादाची ठिणगी (Solapur News)

सोलापूर शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुला-मुलीचा शाही विवाह शहरातीलच एका हॉटेलच्या बैंक्वेट हॉलमध्ये ठरला होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अत्यंत उत्साहात आणि आनंदात हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र, जेवणाची पंगत सुरू होताच या सोहळ्यात वादाची ठिणगी पडली.

अवश्य वाचा : पुणे हादरले! शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार,कोयत्याने हात कापले

नेमकं काय घडलं? (Solapur News)

जेवणासाठी लागलेली लांबच लांब रांग पाहून मुलीकडच्या मंडळींचे गणित बिघडले. ठरलेल्या संख्येपेक्षा जास्त पाहुणे आल्याचे लक्षात येताच, मुलीकडील एका नातेवाईकाने आता वरच्या ताटांचे पैसे तुम्हीच भरा,” असे मुलाकडच्यांना सुनावले. हा टोमणा नवरदेवाकडील मंडळींच्या जिव्हारी लागला आणि भर मंडपात शाब्दिक चकमकीला तोंड फुटले. पाहता पाहता वादाने इतके उग्र रूप धारण केले की, पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेलमध्ये गोंधळाचे वातावरण होते.

हा वाद विकोपाला गेल्याने हे प्रकरण थेट सदर बझार पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनीही दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. विशेष म्हणजे, शहरातील एका समाजसेवकाने आणि ज्येष्ठ पत्रकाराने तर जास्त झालेल्या जेवणाचा सर्व खर्च आम्ही उचलतो, पण तुम्ही हे लग्न लावा,” अशी विनंतीही केली. मात्र दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांचा अहंकार इतका टोकाला पोहोचला होता की, कोणीही एक पाऊल मागे घ्यायला तयार झाले नाही. अखेर चर्चेचे सगळे दरवाजे बंद झाले. 

याबाबत सदर बझार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांनी माहिती दिली की, जेवणावरून लग्न मंडपात वाद झाला होता. आम्ही दोन्ही कुटुंबांना खूप समजावले, चार ते पाच वेळा समुपदेशन केले आणि वाद मिटवण्यासाठी अनेक पर्यायही दिले. मात्र, कोणीच पुढाकार घ्यायला तयार नसल्याने अखेर गुरुवारी दुपारी १२.१४ वाजता होणारा विवाह झालाच नाही. अखेर हा विवाह सोहळा अवघ्या २० ताटांच्या खर्चाच्या वादामुळे मोडला आहे.