Sugarcane Price : नगर : जिल्ह्यातील ऊसदराचा (Sugarcane Price) प्रश्न अखेर मार्गी लागला असून, शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या चर्चेत तोडगा निघाला आहे. यानुसार उसाला पहिली उचल ३ हजार २५० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर मार्चपूर्वी आणखी १०० रुपये, तर साखरेचे दर स्थिर झाल्यानंतर अतिरिक्त १०० रुपये देण्याचे ठरले आहे. अशा प्रकारे उसाला एकूण ३ हजार ४५० रुपये दर देण्याची भूमिका बैठकीत निश्चित करण्यात आली. 28 तारखेला होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.
अखेर चर्चेतून दराबाबत सहमती
ऊसदराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली होती. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, अभिजित पोटे, तोरडकर तात्या यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात पुन्हा चर्चा झाली. अखेर या चर्चेतून दराबाबत सहमती झाली.
बैठकीत राजू शेट्टी यांनी शेजारच्या जिल्ह्यांतील ऊसदराचा मुद्दा उपस्थित केला. शेजारील जिल्ह्यांमध्ये ३ हजार ५०० ते ३ हजार ९०० रुपये पहिली उचल दिली जात असताना कोल्हापूर जिल्ह्यात ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. मग नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी दर का स्वीकारायचा, असा सवाल त्यांनी केला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दरातील तफावत दूर करावी, अन्यथा ऊस पळवापळवीचे प्रकार वाढतील आणि त्याचा फटका शेतकरी तसेच कारखानदारांनाही बसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
शेट्टी यांनी रिकव्हरीच्या गणिताकडेही वेधले लक्ष (Sugarcane Price)
नगर जिल्ह्याची साखर उतारा क्षमता सोलापूरपेक्षा अधिक असल्याचे सांगत शेट्टी यांनी रिकव्हरीच्या गणिताकडेही लक्ष वेधले. ३४१ रुपये प्रतिटक्का रिकव्हरीच्या हिशेबाने ११ टक्के उताऱ्यासाठी ३ हजार ७५१ रुपये दर होतो. मात्र, शेतकरी संघटनेने ३ हजार ७०० रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांना योग्य दर देण्यास टाळाटाळ करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेनेही पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सहकारी बँकेच्या धर्तीवर जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन चार हजारांवरून साडेचार हजार रुपये करावे. त्यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक आधार मिळेल आणि शेतकऱ्यांना योग्य दर देणे शक्य होईल, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, जिल्ह्याची रिकव्हरी, बेसिक साखरेचे दर तसेच ऊसतोडणी आणि वाहतूक खर्चाचा विचार करून सोलापूर जिल्ह्याचे दरनिश्चितीचे सूत्र लक्षात घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारी टिकली पाहिजे आणि कारखाने किमान १२० दिवस चालले पाहिजेत, ही भूमिका मांडतानाच शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
जास्त दर देणाऱ्या कारखान्याला ऊस द्या; शेट्टी (Sugarcane Price)
बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना ज्या कारखान्याकडून अधिक दर मिळेल, त्या कारखान्याला ऊस देण्याचे आवाहन केले. ठरलेल्या दरापेक्षा अधिक दर देण्याची तयारी असलेल्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऊसदराच्या संघर्षाला अखेर तोडगा मिळाला असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष दराच्या अंमलबजावणीकडे लागले आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की, ऊस दरवाढीबाबत दोन वेळा बैठक घेण्यात आली होती मात्र त्यावेळी तोडगा निघाला नाही. आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूर जिल्हाच्या धरतीवर अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्याच्या ऊसाला दर देण्याचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला. यात पहिली उचल 3 हजार 250 रुपये देण्याचे ठरले आहे. तसेच मार्च अखेर 100 रुपये तर साखरचे भाव 5 हजार रुपये प्रमाणे स्थिर राहिल्यास नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शंभर रुपये प्रमाणे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साखर दराची बेस लाईन निश्चित करण्यात आली आहे. या पेक्षा द्यावा ज्यांना अधिक भाव देणे शक्य आहे त्यांनी तो द्यावा. जिल्हा सहकारी बँकेने साखर कारखाना 4 हजार रुपये क्विंटल प्रमाणे तारण कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा दर साडेचार हजार करण्याबाबत जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळांनी निर्णय घ्यावा असेही पालकमंत्री विखे म्हणाले.
नगरसह राज्यातील साखर कारखानदारी तोट्यात आहे असे असले तरी 70 -30 या रेषेत शेतकऱ्यांच्या उसाला भाव देणे बंधनकारक असून तसा कायदा आहे. कालपर्यंत नगर जिल्ह्यातील साखर उतारा 8.7 टक्केच आहे. साखरेची रिकवरी कमी असल्याने कोल्हापूर प्रमाणे नगर जिल्ह्यातील कारखानदारांना दर देणे शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.



