ACB : जमीन भूसंपादन मोबदल्यासाठी मागीतली एक लाख २० हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न

0
ACB : जमीन भूसंपादन मोबदल्यासाठी मागीतली एक लाख २० हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
ACB : जमीन भूसंपादन मोबदल्यासाठी मागीतली एक लाख २० हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

ACB : श्रीगोंदा : राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीच्या भूसंपादनाचा प्रलंबित निधी आणि ‘फंड ट्रान्सफर ऑर्डर’ (Fund Transfer Order) मंजूर करून देण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत श्रीगोंदा-पारनेर विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक मंगेश विजय दुमणे आणि कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : खरवंडी कासार परिसरात दरोडा; दोन कुटुंबांवर हल्ला करून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

एक कोटी ४७ लाख रुपये मंजूर

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांची मौजे जंगलेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील पावणेचार एकर जमीन राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी मधील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी शासनाने भूसंपादित केली आहे. या भूसंपादनाचा मोबदला आणि नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अंतिम व पुरवणी अवॉर्डप्रमाणे एकूण एक कोटी ४७ लाख रुपये मंजूर झाले होते. या मंजूर रकमांचे प्रलंबित प्रकरण आणि ‘फंड ट्रान्सफर ऑर्डर’ उपविभागीय अधिकारी कार्यालयातून काढून देण्यासाठी तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, हे काम करून देण्यासाठी लोकसेवक मंगेश दुमणे आणि अमोल खामकर यांनी वेळोवेळी लाचेची मागणी केली.

महसूल सहाय्यक मंगेश दुमणे याने तक्रारदाराला ४ मे रोजी थेट व्हॉट्सॲप कॉल केला. “जर पैसे दिले तर एफटीओ. लगेच हातात देतो. एफटीओ. जनरेट करण्यासाठी प्रांत साहेबांना पैसे द्यावे लागतील,” असे सांगून एक लाख २० हजार रुपयांची लाच मागितली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न (ACB)

यानंतर तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ६ मे रोजी लाच मागणी पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक मंगेश दुमणे आणि कंत्राटी कर्मचारी अमोल खामकर यांनी संगनमताने तक्रारदाराकडे राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी च्या शेतजमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी एफटीओ. प्रांत कार्यालयातून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात एक लाख २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी आज (ता. १०) कोतवाली पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथे आरोपींविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगर एसीबीच्या पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, पोलिस कर्मचारी गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे करीत आहेत.