Accused arrested : नगर : कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) अत्याचार आणि पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला राहुरी येथून अटक (Accused arrested) केली आहे.
नक्की वाचा : धालवडी- कुळधरण शिवारात कुकडी कालव्यात आढळला अज्ञात पुरुष आणि महिलेचा मृतदेह
विविध कलमांची भर
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २९ फेब्रुवारी २०२४ रोजी एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिची १६ वर्षीय मुलगी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले होते. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पीडित मुलीचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात बलात्कार, गुन्ह्यास मदत करणे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील विविध कलमांची भर घालण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी राहुल संतोष जाधव याच्याविरुद्ध २० जून २०२४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ओळख लपवून पोलिसांना गुंगारा (Accused arrested)
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी सुरेश उत्तम वैराळ (वय ३८) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तब्बल दोन वर्षे त्याने आपले वास्तव्य आणि ओळख लपवून पोलिसांना गुंगारा दिला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या ‘फरार आरोपी शोध मोहिमे’अंतर्गत कोतवाली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर राहुरी परिसरातून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस कर्मचारी राहुल शिंदे, रोहिणी दरंदले, सुरज कदम, रमेश शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने कारवाई केली.



