Action on encroachments: अकोले शहरात अतिक्रमणांवर धडक कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

0

Action on encroachments:अकोले: येथील नगरपंचायतीच्यावतीने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडक कारवाई (Action on encroachments) करण्यात आली. ही मोहीम मुख्याधिकारी धनश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे राबविण्यात आली.
शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच इतर मार्गांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली दुकाने, फेरीवाल्यांचे स्टॉल, फळ विक्रेते, बांधकाम साहित्य व इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोकळा व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे.

अवश्य वाचा- जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई (Action on encroachments)

यापूर्वी संबंधितांना नोटीस देऊन व दवंडी करून अतिक्रमणे स्वखुशीने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच नगरपंचायतीकडून बाजारतळ व गुजरी मार्केट या निर्धारित ठिकाणीच फेरीवाले व फळ विक्रेत्यांनी व्यवसाय करावा, असे सूचित करण्यात आले होते. तरीही अतिक्रमणे न काढल्यामुळे प्रशासनास ही कारवाई करावी लागली. कारवाई दरम्यान काही साहित्य जप्त करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अकोले नगरपंचायतीकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये व शहर स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. भविष्यातही अशा प्रकारच्या धडक मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने नेमून दिलेल्या ठिकाणीच आपला व्यवसाय करावा, असे आवाहन नगरपंचायतच्यावतीने करण्यात आले आहे.