ADCC Bank : खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे यांचे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप; आरबीआयकडे तक्रार करण्याचा इशारा

निलेश लंके यांनी जिल्हा बँकेतील कर्जवाटपावर गंभीर प्रश्न उपस्थित केले

0
ADCC Bank : खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे यांचे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप; आरबीआयकडे तक्रार करण्याचा इशारा
ADCC Bank : खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे यांचे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप; आरबीआयकडे तक्रार करण्याचा इशारा

ADCC Bank : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) निवडणुकीत प्रस्थापित विरुद्ध विस्तारित अशा संघर्षाचे चित्र पाहायला मिळाले. अवघ्या १५ दिवसांत निवडणुकीची तयारी करूनही आम्ही प्रस्थापितांना चांगली टक्कर दिली. ही निवडणूक (Election) कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांच्याच हाती राहावी, या भूमिकेतून लढवली. मात्र, बँकेतील २७८० कोटी रुपयांच्या कर्जापैकी जवळपास ५० टक्के कर्ज अवघ्या सहा जणांकडे असल्याचे समोर येत असेल, तर ही शेतकऱ्यांची बँक कशी, असा सवाल प्रताप ढाकणे (Pratap Dhakne) यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी विखे, राजळे, कोल्हे, गडाख यांची नावे चर्चेत; मुख्यमंत्री काय निर्णय घेणार?

प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवावी लागली : ढाकणे

ढाकणे म्हणाले, जिल्हा बँकेची मते ही बांधलेली मते होती. त्यामुळे मर्यादित वेळ आणि प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवावी लागली. बँकेवर कारखानदारांचे वर्चस्व राहायचे आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष व्हायचे, ही परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे. बँकेच्या आर्थिक स्थितीला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊनच आम्ही ही लढाई लढलो. निलेश लंके खासदार झाल्याचेही काहींना अद्याप पचलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे, हर्षदा काकडे, शिवाजीराव काकडे आदी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कर्जवाटपावर गंभीर प्रश्न उपस्थित (ADCC Bank)

खासदार निलेश लंके यांनी जिल्हा बँकेतील कर्जवाटपावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. जिल्ह्यातील ठरावीक लोक एकत्र येऊन राजकारण आणि आर्थिक सत्तेच्या जोरावर व्यवस्था नियंत्रित करत आहेत. आमच्याकडे त्यांच्याइतकी आर्थिक ताकद नसली, तरी आम्ही हा लढा दिला. बँकेच्या कर्जप्रकरणांची सखोल चौकशी झाली पाहिजे. १२ कारखानदारांकडे सुमारे २८५० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा आरोप करत त्यांनी राहुरी कारखान्यासाठी ३०० कोटी रुपये हातउसने घेतल्याचे सांगितले. या व्यवहाराची कागदपत्रे कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला.

या सर्व प्रकरणांची कागदपत्रे गोळा करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) तक्रार करणार असून, सत्तेत कोणीही असले तरी कर्जप्रकरणांचा पाठपुरावा सोडणार नाही, असा इशारा लंके यांनी दिला. बिनविरोध निवडणुकीचा दबाव होता. बँकेतील भरती प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराचाही शोध घेणार आहोत. पुढील वर्षी संस्था उभ्या करून पुन्हा ताकदीने लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मतदारांची संख्या वाढवावी लागेल : काकडे

शिवाजीराव काकडे यांनी या निवडणुकीबाबत जिल्ह्यातील १२ प्रस्थापित घराण्यांविरुद्ध सामान्य शेतकऱ्यांचा संघर्ष असे केले. आर्थिक ताकद विरुद्ध सामान्य माणूस अशी ही लढत होती. सर्व शक्ती एकत्र करूनही आम्ही लढलो. मतदार यादीचा अभ्यास करता संगमनेर आणि कोपरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मतदार असल्याचे दिसते. दक्षिण जिल्ह्यातही मतदारसंख्या वाढली असती, तर निकाल वेगळा लागला असता. भविष्यात दक्षिण जिल्ह्याचे बँकेतील प्रतिनिधित्व वाढवायचे असेल, तर संस्थांची आणि मतदारांची संख्या वाढवावी लागेल, असे ते म्हणाले. हर्षदा काकडे यांनीही आगामी काळात हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असताना शासनाने तत्परतेने चारा छावण्या सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, शासनाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोपही खासदार लंके यांनी केला.