ADCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचा शंखनाद; ‘या’ तारखेला मतदान, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम 

0
ADCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचा शंखनाद; ‘या’ तारखेला मतदान, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम 
ADCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीचा शंखनाद; ‘या’ तारखेला मतदान, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम 

ADCC Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून काल (ता. २३) अधिकृत निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. येत्या २८ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, २ नोव्हेंबर रोजी मतदान तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता खऱ्या अर्थाने उधाण येणार आहे.

डिंबे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही… अन्यथा आंदोलन छेडू… रोहित पवारांचा इशारा

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला 

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या प्रभावामुळे अहिल्यानगरमधील कोणत्याही निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. साहजिकच जिल्हा बँकेची ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बँक निवडणुकीच्या वेळापत्रकाबाबत गेल्या आठवड्यापासून लागलेली उत्सुकता अखेर काल (ता. २३) सायंकाळी उशिरा संपली. बँकेच्या २१ संचालक पदांसाठी एकूण ३,८३६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

अन्यथा अहिल्यानगर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक होणार नाही – संग्राम जगताप

जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम (ADCC Bank Election)

जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे दाखल केली जातील. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी प्राप्त अर्जांची छाननी होणार असून, ७ ते २१ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी चिन्हांचे वाटप केले जाईल, तर २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाईल. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर दिग्गज नेत्यांचे प्रयत्न सुरु झाले असून, ही प्रक्रिया पुढे काय वळण घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.