नगर : तुम्ही वापरत असलेला ब्रँडेड शॅम्पू खरा आहे की बनावट? असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar Crime) नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट शॅम्पू तयार करणाऱ्या (Manufacturing Counterfeit Shampoo) एका आंतरराज्य टोळीला एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नेमका हा बनावटगिरीचा खेळ कसा चालत होता? ते सविस्तर जाणून घेऊयात…
नक्की वाचा: लाडक्या बहिणी प्रतीक्षेत; कधी मिळणार योजनेचे पैसे?
नेमकं प्रकरण काय? (Ahilyanagar Crime)
एमआयडीसी पोलिस ९ मे ला सायंकाळी नागापूर येथील आठवडे बाजारात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी येथील सह्याद्री चौकात एक व्यक्ती विविध नामांकित कंपन्यांच्या शॅम्पूच्या बाटल्यांची अत्यंत स्वस्त दरात विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथकाने सापळा रचून शानमोहम्मद पप्पूखान आलबी याला ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या काळ्या धंद्याची कबुली दिली. त्याच्यासोबतच रब्बानी रज्जाक अब्बास, फैजान अहमदअली खान या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हे आरोपी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या क्लिनिक प्लस, डव्ह, हेड अँड शोल्डर्स व पॅन्टीन या नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायचे. त्यामध्ये अज्ञात धोकादायक केमिकलचे मिश्रण भरून, ग्राहकांची दिशाभूल करून अस्सल शॅम्पू म्हणून त्याची विक्री करायचे. हा शॅम्पू मानवी आरोग्याला आणि केसांसाठी अत्यंत अपायकारक आहे हे माहीत असतानाही, बनावट ट्रेडमार्क आणि लेबल वापरून ते बाजारपेठेत विकत होते, असं पोलिसांच्या चौकशीत समोर आले.
अवश्य वाचा: ‘घबाडकुंड’ मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री!
बनावट शॅम्पू जप्त (Ahilyanagar Crime)
पोलिसांनी त्यांच्याकडून केमिकल मिश्रणाने बनवलेले हे सगळे बनावट शॅम्पू जप्त केले आहेत. त्यासह बाटल्यांच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, घातक केमिकल व पावडर असा १ लाख १८ हजार १८६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. याबाबत हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे फिल्ड ऑफिसर किरीट गुणवंतराय पंड्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूक, कॉपीराइट आणि ट्रेडमार्क कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.



