Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक वाटचाल भक्कम; ६८.९६ कोटीचा नफा

0
Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक वाटचाल भक्कम; ६८.९६ कोटीचा नफा
Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक वाटचाल भक्कम; ६८.९६ कोटीचा नफा

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Ahilyanagar District Central Cooperative Bank) आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवित ६८.९६ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. बँकेच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Annual General Meeting) प्रशासक संगिता रविंद्र डोंगरे (Sangita Ravindra Dongre) यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आणि विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

३१ मार्च २०२६ अखेर बँकेचे भागभांडवल ४०३.६४ कोटी रुपये, निधी १,५२८.२९ कोटी रुपये, ठेवी ११,३११.१४ कोटी रुपये, गुंतवणूक ५,७६१.१० कोटी रुपये आणि कर्ज येणेबाकी ७,७२६.२८ कोटी रुपये झाली आहे. बँकेचे खेळते भांडवल १५,३६७.७३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

बँकेच्या एकूण कर्ज येणेबाकीत अल्पमुदत पीक कर्जाचा वाटा ३,८४२.२१ कोटी रुपये, मध्यम मुदत कर्ज ९९६.६० कोटी रुपये, दीर्घ मुदत कर्ज १२७.१० कोटी रुपये, तर विविध कॅश क्रेडिट, पगारदार पतसंस्था व वैयक्तिक कर्जांची येणेबाकी २,७२४.८६ कोटी रुपये आहे.

शेतकरी कर्जवाटपाला प्राधान्य

अहवाल वर्षात बँकेने २,७१४.७० कोटी रुपयांचे अल्पमुदत पीक कर्ज तसेच पशुपालनासाठी खेळते भांडवल म्हणून १९६.९५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. मध्यम मुदतीच्या कर्जांत साखर कारखाने, ठिबक सिंचन, शेळी-मेंढी पालन, हार्वेस्टर, डेअरी विकास, संकरीत गाई व बैल खरेदी आदींसाठी ५३९.३२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ट्रॅक्टर, घरकुल, गोदाम, शैक्षणिक कर्ज व शेततळे यासाठी १२.०४ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात आले.

शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड केल्यास केंद्र व राज्य शासनाच्या व्याज सवलतीमुळे तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळत असल्याचेही सांगण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एकरकमी कर्ज परतफेड योजनेला प्रतिसाद (Ahilyanagar District Central Cooperative Bank)

३० जून २०१६ पूर्वीची थकबाकी असलेल्या कर्जदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंतर्गत १६ सप्टेंबर २०२३ ते ३० जून २०२६ या कालावधीत ७१३ सभासदांनी सहभाग घेतला. या सभासदांना ३ कोटी १५ लाख रुपयांची सवलत देण्यात आली असून बँकेने १३ कोटी ६२ लाख रुपयांची जुनी थकबाकी वसूल केली आहे.

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक जोड

३१ मार्च २०२६ अखेर बँकेशी ३०,५०७ स्वयंसहाय्यता बचत गट संलग्न असून त्यामाध्यमातून ३,४७,९२३ महिला बँकेच्या आर्थिक व्यवहाराशी जोडल्या गेल्या आहेत. अहवाल वर्षात एपीएल व एनआरएलएम बचत गटांना मिळून ३०९.८७ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. प्रधानमंत्री मुद्रा योजना व जेएलजी योजनेंतर्गतही १४७ गटांना २३८.५८ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.

सोनेतारण कर्जाचा विस्तार

सर्वसामान्य खातेदार व शेतकऱ्यांसाठी सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ३१ मार्च २०२६ अखेर या कर्जाची येणेबाकी १४६.०४ कोटी रुपये आहे. भविष्यात सोनेतारण कर्ज व्यवसाय ५०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

एनपीएवर नियंत्रणासाठी प्रयत्न

बँकेची कर्जवसुली ३० जून २०२५ अखेर ५१.४३ टक्के होती, तर ३० जून २०२६ अखेर ती ४५.४४ टक्के झाली आहे. कर्जवसुलीमध्ये सुधारणा करण्यासाठी सभासदांनी कर्जाची नियमित परतफेड करावी, असे आवाहन करण्यात आले.

३१ मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण एनपीए ९६९.६८ कोटी रुपये अर्थात १२.५५ टक्के आहे. एनपीएसाठी ८३१.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून एनपीएवरील व्याजासाठीही ९० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बँकेचे निव्वळ एनपीए शून्य असल्याचे अध्यक्षीय भाषणात नमूद करण्यात आले.

संगणकीकरण व डिजिटल बँकिंगवर भर

बँकेचे मुख्यालय, २८७ शाखा आणि ११ विस्तार कक्ष कोअर बँकिंग प्रणालीशी जोडण्यात आले आहेत. ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस, एटीएम, मोबाईल बँकिंग, यूपीआय, डीबीटी यांसह विविध डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बँकेची स्वतःची ८८ एटीएम कार्यान्वित असून शाखांमध्ये मायक्रो एटीएमची सुविधाही उपलब्ध आहे.

सायबर सुरक्षेसाठी अद्ययावत डेटा सेंटर, डिझास्टर रिकव्हरी साइट, फायरवॉल, नेटवर्क व इतर सुरक्षा प्रणाली उभारण्यात आल्या असून सायबर हल्ल्यांपासून बँकेची सुरक्षितता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पीक विमा व शासकीय योजनांची अंमलबजावणी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये ९५६ कर्जदार शेतकरी सभासदांचा ५.५० लाख रुपयांचा विमा हप्ता भरला. हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत २८३ शेतकऱ्यांसाठी १६.४२ लाख रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला.

विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या १८ ते ७० वयोगटातील सभासद शेतकऱ्यांसाठी २० रुपये वार्षिक प्रीमियममध्ये दोन लाख रुपयांच्या अपघाती विम्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णयही बँकेने घेतला आहे.

पीएसीएस संगणकीकरणाला गती

केंद्र शासनाच्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या संगणकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १,३९७ संस्थांपैकी पहिल्या टप्प्यात ९४६ संस्था समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ९३६ संस्थांचे ई-पॅक्स कामकाज पूर्ण झाले असून उर्वरित संस्थांचे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली असून १ मे १९५८ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेचे ५,९७३ सहकारी संस्था आणि ८९८ व्यक्ती असे एकूण ६,८७१ सभासद आहेत. बँकेच्या प्रगतीसाठी सभासद, ठेवीदार, शेतकरी, कर्मचारी, सहकारी संस्था, हितचिंतक आणि ग्राहकांचे सहकार्य कायम राहावे, असे आवाहन प्रशासक श्रीमती संगिता रविंद्र डोंगरे यांनी केले.