Akole : अकोले : तालुक्यातील राजूर येथे अपर तहसील कार्यालय सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या असून येत्या ऑगस्ट महिन्यात हे कार्यालय कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासन स्तरावरून गुरुवारी (ता. ११) प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाबाबत १५ दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : खरवंडी कासार बंद; वाढत्या चोऱ्यांविरोधात नागरिकांचा रास्ता रोको
अनेक वर्षांपासून मागणी
राजूर परिसरातील आदिवासीबहुल व दुर्गम डांग भागातील सुमारे चाळीस गावांच्या नागरिकांना प्रशासकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अनेक वर्षांपासून अपर तहसील कार्यालयाची मागणी होत होती. या मागणीला आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केल्याने आता त्याला यश मिळत असल्याची माहिती विनय सावंत यांनी दिली. राजूर तालुका निर्मितीची मागणी देखील या भागातून सातत्याने होत असून अपर तहसील कार्यालय सुरू होणे हा त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की पहा : FDA च्या कारवाया फक्त अधिवेशनापुरत्या नकोत- विक्रम पाचपुते
‘या’ महसूल मंडळांचा समावेश (Akole)
शासनाच्या निर्देशानुसार प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचे दैनंदिन संकलन, तपासणी व विश्लेषण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या संदर्भातील अभिप्राय १ जुलै, २०२६ पर्यंत शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. प्रस्तावित राजूर अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राजूर, साकीरवाडी, वाकी, शेंडी, कोतूळ आणि खिरविरे या महसूल मंडळांचा समावेश राहणार आहे. तर अकोले तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अकोले, रुंभोडी, समशेरपूर, विरगाव, लिंगदेव आणि ब्राह्मणवाडा या महसूल मंडळांचा समावेश असेल.



