रात्रीच्या मोहिमेत १ हजार १३६ वाहनांची तपासणी; अवैध धंद्यांवर २३ कारवाया, ८२ वॉरंट बजावले
All-Out Operation : नगर : जिल्ह्यातील अवैध धंदे, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण (Keeping habitual criminals in check) मिळविण्यासाठी अहिल्यानगर पोलीस दलाने शुक्रवारी (ता. ९) रात्रीपासून शनिवारी (ता. १०) पहाटेपर्यंत ‘ऑल आऊट’ ऑपरेशन (‘All-Out’ Operation) राबविले. या विशेष मोहिमेत जिल्हाभरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, फरार व पाहिजे आरोपी, हद्दपार केलेले आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस कर्मचारी तैनात
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या मोहिमेत ५७ पोलीस अधिकारी, २०७ पोलीस अंमलदार आणि १०१ होमगार्ड सहभागी झाले होते.
मोहिमेदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करून एकूण १ हजार १३६ वाहनांची तपासणी केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध २२६ प्रकरणे दाखल करण्यात आली, तर मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी १२ जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय हॉटेल आणि लॉजिंगची २५५ ठिकाणी तपासणी करण्यात आली. हद्दपार केलेल्या ५० आरोपींची तपासणी करण्यात आली, तर न्यायालयाचे ८२ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. सराईत गुन्हेगारांचीही १५९ ठिकाणी तपासणी करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अवैध धंद्यांवर २३ कारवाया (All-Out Operation)
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी २३ कारवाया केल्या. तसेच फरार आरोपींच्या अभिलेखातून २० नावे आणि पाहिजे आरोपींच्या अभिलेखातून ३६ नावे कमी करण्यात आली. या कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासह प्रलंबित प्रकरणांतील आरोपींचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.



