
नगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होणाऱ्या लाखो वारकऱ्यांमधून शासकीय महापूजेसाठी (Ashadhi Ekadashi Mahapuja) निवड होणे हा प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या आयुष्यातील सर्वोच्च आणि भाग्याचा सन्मान मानला जातो. ही निवड कशी होते, हे आपण कालच्या भागात पाहिलं. यंदा हा ऐतिहासिक बहुमान धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माधव माने (Babasaheb Mane) व प्रभावती बाबासाहेब माने (Prabhavati Mane) यांना मिळाला आहे. या अभूतपूर्व सन्मानामुळे कळंब तालुक्याच्या आध्यात्मिक व वारकरी परंपरेत सुवर्णाक्षरांनी मानपत्र जोडले गेले आहे. आता हे दाम्पत्य नेमकं कोण आहे ? ते पाहू…
नक्की वाचा : विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचा पहिला वारकरी कसा निवडला जातो?
२० वर्षांची अविरत भक्ती,संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसोबत पायी वारी (Ashadhi Ekadashi Mahapuja)
चंद्रभागेच्या तिरी आषाढीच्या महा सोहळ्यासाठी दरवर्षी विठ्ठल भक्तांचा जनसागर लोटतो. ऊन -पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरची पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये माने कुटुंब मागील दोन दशकांपासून अविरत सेवा देत आहे. ७० वर्षीय बाबासाहेब माने आणि प्रभावती माने हे दाम्पत्य मागील सलग २० वर्षांपासून पंढरीची वारी करत असून, यंदाही त्यांनी आळंदीवरून निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन संपूर्ण पायी वारी पूर्ण केली. त्यांच्या याच अखंड निष्ठा आणि भक्तीचे फळ म्हणून विठुरायाने हा महापूजेचा मान दिलाय. मध्यरात्री १२ वाजता दर्शन रांग बंद झाल्यानंतर रांगेत सर्वप्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची निवड समितीने मानाच्या वारकऱ्यासाठी निवड केली. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री दाम्पत्यासमवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.
अवश्य वाचा : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी आज जाहीर होणार,कोणाला मिळणार लाभ?
कळंब तालुक्याला प्रथमच शासकीय महापूजेचा हा बहुमान (Ashadhi Ekadashi Mahapuja)
विशेष म्हणजे, कळंब तालुक्याच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच शासकीय महापूजेचा हा बहुमान या तालुक्यातील वारकरी कुटुंबाला मिळाला आहे. माने कुटुंब मूळचे अत्यंत साधे शेतकरी असून, त्यांच्या घरात वारीची परंपरा दुसरी पिढी जोपासत आहे. शेतीची कष्टाची कामे सांभाळत मुखी विठ्ठलाचे नामस्मरण आणि पायी वारी असा त्यांचा जीवनक्रम आहे. त्यांच्या या सन्मानाने संपूर्ण गौरगाव आणि कळंब तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापूजेनंतर भावना व्यक्त करताना बाळासाहेब माने म्हणाले, “मी गेल्या वीस वर्षांपासून एकही आषाढी वारी चुकवलेली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मला आणि माझ्या पत्नीला शासकीय महापूजेचा मान मिळाला, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेता आले, यापेक्षा मोठे भाग्य नाही.” यावेळी त्यांनी विठ्ठल चरणी संपूर्ण राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करत, “पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव. राज्यात चांगला पाऊस पडू दे आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद नांदो,” असे साकडे देवाला घातले.


