BLO : पाथर्डी : बीएलओची (BLO) जबाबदारी असलेल्या पाथर्डीतील प्राथमिक शिक्षिकेचा मृत्यू (Death of a female teacher) झाला असून कामाच्या ताणातून मृत्यू झाल्याचा दावा पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने (Pathardi Taluka Primary Teachers’ Coordination Committee) केला आहे. सुनीता उत्तमराव पोपळभट असे या प्राथमिक शिक्षिकेचे नाव आहे. पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने प्रशासनाकडे मृत शिक्षिकेच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्यावरील सर्व कायदेशीर संरक्षण, विमा लाभ आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच बीएलओ म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ऑन ड्युटी’ संरक्षणाची लेखी हमी देण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नक्की वाचा : रेल्वे प्रश्नावर तीन जिल्ह्यातील आमदार एकवटले; मंत्री विखे पाटील यांचा पुढाकार
कामाच्या ताणातून मृत्यू झाल्याचा शिक्षक संघटनेचा दावा
समितीने दिलेल्या निवेदनानुसार, सुनीता पोपळभट यांच्याकडे निवडणूक विभागाचे बीएलओ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या कामामुळे शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात मानसिक दडपण असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. रविवारी (ता. २८) त्यांनी बीएलओचे साहित्य ताब्यात घेतले होते. त्यानंतर कामाच्या वाढत्या ताणामुळे त्या मानसिक दडपणाखाली होत्या. मंगळवारी (ता. ३०) त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.या घटनेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, निवडणूक कामाच्या ताणामुळे एका शिक्षिकेचा बळी गेल्याची भावना शिक्षक बांधवांनी व्यक्त केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य तातडीने मंजूर करावे (BLO)
या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन पोपळघट यांच्या कुटुंबाला राष्ट्रीय कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यामुळे मिळणारे सर्व कायदेशीर लाभ, विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य तातडीने मंजूर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व बीएलओ कर्मचाऱ्यांना निवडणूक व विशेष पुनर्निरीक्षणासारख्या तणावपूर्ण कामकाजादरम्यान संपूर्ण कायदेशीर संरक्षण ऑन ड्युटी दर्जा आणि सुरक्षिततेची लेखी हमी देण्यात यावी अशीही मागणी शिक्षक समन्वय समितीने केली आहे.
अनेक शिक्षक सहभागी
हे निवेदन अहिल्यानगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील अनेक महिला शिक्षिका, शिक्षक आणि शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थितीत तहसिलदार डॉ. उद्धव नाईक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र जायभाये, अर्जुन शिरसाट, कल्याण लावंडे, गीता खेडकर, जयश्री कीर्तने, भालचंद्र गर्जे, महादेव गोल्हार, मीरा मुंढे, शैला डोईफोडे, बाबा जायभाये, संजय कीर्तने, रमेश वाघ, पप्पू बोरुडे यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले.



