Brutal Beating : संगमनेर : दुचाकी दुरुस्तीच्या क्षुल्लक कारणावरून संगमनेर येथील एका शोरूममध्ये ग्राहकाला आणि त्यांच्या सासऱ्याला लोखंडी रॉड व स्क्रू ड्रायव्हरने बेदम मारहाण (Brutal Beating) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड यांच्यासह ५ नामनिर्देशित आणि इतर १० ते १२ कर्मचाऱ्यांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात (Sangamner City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास शोरूमसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा (Warning of Protest) ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आले आहे.
नक्की वाचा : सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य संघटकपदी चंद्रशेखर हासे यांची नियुक्ती
विचारणेवरून कर्मचारी आणि स्वप्निल यांच्यात वाद
याबाबत समजलेली माहिती अशी की, स्वप्निल सातपुते (वय २५, रा. कासारा दुमाला, ता. संगमनेर) आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी दुरुस्तीसाठी संबंधीत शोरूममध्ये घेऊन गेले होते. शोरूममध्ये गेल्यानंतर बराच वेळ झाला तरी कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची पावती दिली नाही आणि वाहनही जमा करून घेतले नाही. त्यामुळे स्वप्निल यांनी याबाबत शोरूम व्यवस्थापनाकडे विचारणा केली. या विचारणेवरून कर्मचारी आणि स्वप्निल यांच्यात वाद सुरू झाला. शोरूममधील गैरकारभाराचा व्हिडिओ स्वप्निल आपल्या मोबाईलवर चित्रीत करत असल्याचे पाहताच मॅनेजर आणि कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी थेट लोखंडी रॉड आणि स्क्रू ड्रायव्हर सारख्या घातक शस्त्रांनी स्वप्निल व त्यांच्या सासऱ्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वाढीव कलमे लावण्याची मागणी (Brutal Beating)
या जीवघेण्या हल्ल्यात स्वप्निल सातपुते आणि त्र्यंबक राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्निल सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन घुमाळ आणि धारणकर यांच्यासह इतर १० ते १२ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कासारा दुमाला येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जखमी स्वप्निल सातपुते यांच्या पत्नीने पतीची गंभीर प्रकृती पाहता संशयित आरोपींवर कठोर कारवाई करून गुन्ह्यात वाढीव कलमे लावण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच, घटनेची सत्यता समोर येण्यासाठी शोरूममधील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तातडीने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी त्र्यंबक राऊत यांनी केली आहे.
कायदेशीर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
दरम्यान, कासारवाडी व परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांची भेट घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणात योग्य आणि कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.



