
आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; डिजिटल भारत निधीतून गावात उभारणार नेटवर्क सुविधा
Central Government : संगमनेर : संगमनेर तालुक्यातील कुंभारवाडी गावात मोबाईल नेटवर्कचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) ‘डिजिटल भारत निधी’अंतर्गत कुंभारवाडी गावातील 4G मोबाईल नेटवर्क (4G Mobile Network) प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajeet Tambe) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
महत्त्वाच्या कामांसाठी नेटवर्क शोधत भटकावे लागत होते
कुंभारवाडी येथे भेटीदरम्यान ग्रामस्थांकडून मोबाईल नेटवर्क नसल्याची समस्या सातत्याने मांडली जात होती. नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसारखी महत्त्वाची कामे करण्यासाठी नेटवर्क शोधत भटकावे लागत होते. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेतही नेटवर्कअभावी महिलांना अनेक अडचणी येत होत्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आमदार तांबे यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे पत्रव्यवहार (Central Government)
ग्रामस्थांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्रव्यवहार करून या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक यश मिळाले असून, आता डिजिटल भारत निधीच्या 4G प्रकल्पात कुंभारवाडीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच गावात मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मोबाईल नेटवर्क उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची शासकीय कामे, महिलांच्या योजनांची ई-केवायसी प्रक्रिया तसेच गावकऱ्यांचा दैनंदिन संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, पोखरी बाळेश्वर, वनकुटे, पिंपळगाव माथा, भोजदरी, धुमाळवाडी आणि डोळासणे या गावांमध्येही मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार तांबे यांचा पाठपुरावा सुरू आहे. ग्रामीण भागातील डिजिटल दरी दूर करून दुर्गम गावांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याने या उर्वरित गावांचाही नेटवर्कचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.


