Collector : नगर : जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येत असून, मंजूर निधीतून करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन तातडीने सादर करण्यात यावे. तसेच, गतवर्षातील प्रलंबित कामे आणि ‘स्पिल’ (मागील वर्षाची अपूर्ण कामे) कामांच्या मागणीची माहिती संबंधित विभागांनी विलंब न करता उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
हेही वाचा : चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत; कोपरगाव पोलिसांची कामगिरी
पावसाळ्यापूर्वीची कामे गतीने पूर्ण करा
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून हाती घेण्यात येणारी विकासकामे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. मंजूर निधीचा प्रभावी आणि वेळेत वापर होण्यासाठी प्रत्येक विभागाने कामांचे नियोजन काटेकोरपणे तयार करावे. गतवर्षातील अपूर्ण व प्रलंबित कामे तसेच ‘स्पिल-ओव्हर’ कामांच्या मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. पावसाळा जवळ आला असल्याने, पावसाळ्यापूर्वीची कामे गतीने पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नक्की पहा : अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर कारवर दगडफेक; सावेडीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
विकासकामांच्या अंमलबजावणीत विलंब नको (Collector)
शासनाचे सौर ऊर्जेच्या वापराला प्राधान्य असून, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये टप्प्याटप्प्याने सौरऊर्जा कार्यान्वित करण्यात यावीत. ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर वाढविणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाने त्यांना मंजूर करण्यात आलेल्या निधीसंदर्भात तांत्रिक मान्यता घेऊन, प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. विकासकामांच्या अंमलबजावणीत अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बैठकीत विविध विभागांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंजूर निधी, प्रलंबित कामे, प्रस्तावांची सद्यस्थिती तसेच आगामी नियोजनाबाबत संबंधित विभागांकडून माहिती सादर करण्यात आली.



