नगर : एका क्षणाचा राग आणि सुखी संसाराचा भयानक अंत! ज्या हातांनी पत्नीचा हात धरला, त्याच हातांनी हातोडा उचलला. कोपरगावमध्ये (Kopargaon News) हादरवून सोडणाऱ्या त्या निर्घृण हत्याकांडाचा (Brutal Massacre) अखेर निकाल लागला आहे. चारित्र्याच्या संशयावरून आपल्याच पत्नीची हातोड्याने निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची (Life Imprisonment) मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. अरुण रतन दाभाडे असं या आरोपीचे नाव असून, न्यायाधीश डी. डी. अलमले यांनी आरोपीला ५ हजार रुपये दंडासह ही कठोर शिक्षा ठोठावली आहे. ही सुन्न करणारी घटना १९ फेब्रुवारी २०२४ ला घडली होती.
नक्की वाचा: आता मंत्रालयाला उच्च सुरक्षेचं कवच; मंत्रालयाभोवती असणार घातक एलिट गार्ड
नेमकं काय घडलं होत? (Crime News)

मयत महिला ही दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कोपरगाव येथील आचारी हॉस्पिटलमधून जेवण करण्यासाठी जेऊर पाटोदा येथील घराकडे पायी जात होती. त्याचवेळी वाटेत दबा धरून बसलेल्या अरुण दाभाडे याने संशयाच्या भरात तिच्यावर हल्ला चढवला. सोबत आणलेल्या लोखंडी हातोड्याने सपासप वार करून तिला जागीच ठार मारले होते. या घटनेने संपूर्ण कोपरगाव तालुका हादरून गेला होता. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास चक्र फिरवली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी या घटनेचा पंचनामा आणि पुराव्यांचे संकलन करून तातडीने दोषारोपपत्र दाखल केले.
अवश्य वाचा: ‘कैसा हराया’ म्हणणाऱ्या सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात; नेमकं प्रकरण काय?
दोन वर्षांच्या आत प्रकरणाचा निकाल (Crime News)
सरकारी वकील शरद गुजर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना १२ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली. दोन वर्षांच्या आत या प्रकरणाचा तपास, साक्षी- पुरावे आणि अंतिम निकाल लागल्याने न्यायालयीन प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या खटल्यात महिला फौजदार नंदा गलांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष माळी, फटांगरे आणि वर्पे यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. संशयापायी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमाला अखेर त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याची भावना समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहे.



