District Bank Election : भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर; जिल्हा बँकेच्या 13 जागांसाठी निवडणूक

एकमेकांना शह देण्याच्या राजकारणात बिनविरोधचा डाव फसला; भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर!

0
District Bank Election : भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर; जिल्हा बँकेच्या 13 जागांसाठी निवडणूक
District Bank Election : भाजपमधील दुफळी चव्हाट्यावर; जिल्हा बँकेच्या 13 जागांसाठी निवडणूक

District Bank Election : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Ahilyanagar District Central Cooperative Bank) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी बैठकांवर बैठका घेतल्या, एकीचे डोस पाजले आणि दुष्काळाचे कारण पुढे करत निवडणूक (Election) टाळण्याचा आव आणला. मात्र, पडद्यामागे सुरू असलेली जागांची सौदेबाजी, समर्थकांना संचालक करण्यासाठी सुरू असलेली धडपड आणि एकमेकांचे राजकीय पाय खेचण्याच्या खेळात अखेर बिनविरोधचा (Uncontested) फार्स उघडा पडला! जनतेसमोर एकीचा देखावा आणि प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाला आपापला राजकीय हिशेब चुकता करायचा होता. त्यामुळे आठ दिवसांच्या बैठकांनंतरही नेत्यांचे सूर जुळले नाहीत. परिणामी, २१ संचालकपदांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १३ जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात विरुद्ध शिंदे-लंके अशी राजकीय विभागणी ठळक होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे भाजपमधील अंतर्गत संघर्षानेच या निवडणुकीला वेगळे वळण दिले असून, पक्षातील एका गटाने काँग्रेसशी, तर दुसऱ्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक साधल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

नक्की वाचा : सरकारने शेतकऱ्यांसोबत शेतमजुरांच्या पाठीशी ही उभे राहावे : बाळासाहेब थोरात

राजकीय हालचालींना वेग

जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मांडली. त्यांच्या भूमिकेनंतर राजकीय हालचालींना वेग आला. सभापती राम शिंदे यांनीही सुरुवातीपासून निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेतली, तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जवळीकीने नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. मात्र, ही एकी जिल्ह्याच्या हितासाठी होती की राजकीय सोयीसाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण दुष्काळाच्या नावाखाली बिनविरोधचा आग्रह धरणारे नेते जागावाटपाच्या वेळी मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले. शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करून सुरू झालेली चर्चा अखेर नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईत अडकली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विखे पाटील आणि थोरात यांच्यात तासभर चर्चा (District Bank Election)

यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी बुधवारी विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते. मात्र, या चर्चेला राम शिंदे उपस्थित नसल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांतील फटी उघड झाल्या. एका बाजूला सर्वपक्षीय एकीच्या चर्चा आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र बैठका, स्वतंत्र उमेदवार आणि स्वतंत्र राजकीय गणिते सुरू होती. मग बिनविरोध निवडणूक होणार तरी कशी? नेत्यांनाच एकमेकांवर विश्वास नसेल, तर कार्यकर्त्यांनी कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राम शिंदेंची उमेदवार यादी; चर्चेच्या टेबलावरच राजकीय बॉम्ब!

बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना निर्णायक धक्का

बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना निर्णायक धक्का बसला तो राम शिंदे यांनी आपल्या समर्थक चार उमेदवारांची नावे समाजमाध्यमांवर जाहीर केल्यानंतर. जामखेड सोसायटी मतदारसंघातून सचिन घुमरे, कर्जत सोसायटी मतदारसंघातून ज्योती प्रकाश शिंदे, महिला राखीव मतदारसंघातून मंजुषा राजेंद्र गुंड आणि ओबीसी मतदारसंघातून आजीनाथ रामभाऊ हजारे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला. एकीकडे चर्चांचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. चर्चेत एक आणि मैदानात दुसरेच, असा प्रकार झाल्याने विखे-थोरात गटात नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. कर्जतच्या जागेवर तडजोड होण्याची शक्यता असली, तरी जामखेडच्या जागेवर माघार घेण्यास शिंदे गट तयार नसल्याने एकमताचा मार्ग बंद झाल्याचे बोलले जात आहे.

शिंदे-लंकेच्या उमेदवारांना विरोध; जागावाटपातच बिनविरोधचा बळी!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांच्या पसंतीच्या उमेदवारांना किती जागा द्यायच्या, यावरून संघर्ष निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांना स्वीकारायचे की त्यांना रोखायचे, हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी होता. थोरात गटाची भूमिका कठोर असल्याचे सांगितले जात असताना शिंदे गटानेही आपल्या समर्थकांच्या जागांवर तडजोड करण्यास नकार दिल्याचे बोलले जाते. परिणामी, बिनविरोध निवडणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकीय चर्चांचे पितळ उघडे पडले. खासदार नीलेश लंके यांनीही आपल्या संपर्कातील नेत्यांशी चर्चा सुरू ठेवली होती. मात्र, प्रत्येक गट आपापल्या समर्थकांसाठी आग्रही राहिल्याने सर्वमान्य तोडगा निघू शकला नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाला संधी द्यायची, यापेक्षा कोणाला रोखायचे, यालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपमध्येच दोन तट! विखे-थोरात एका बाजूला, शिंदे-लंके दुसऱ्या बाजूला!

या निवडणुकीने भाजपमधील अंतर्गत संघर्षाला पुन्हा एकदा उघडे पाडले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील जवळीक एका बाजूला चर्चेत असताना सभापती राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके यांच्यातील राजकीय समन्वयाची चर्चा दुसऱ्या बाजूला रंगत आहे. भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांशी हातमिळवणी केल्याचे चित्र असल्याने ही निवडणूक केवळ बँकेच्या संचालकपदापुरती मर्यादित राहिलेली नाही. जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व कोणाचे, आगामी काळात निर्णय कोण घेणार आणि कोणाचा शब्द अंतिम ठरणार, याचीच ही लढाई बनली आहे. वरकरणी पक्ष एक असला, तरी स्थानिक राजकारणात गटांचे हिशेब वेगळे असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट होत आहे.

राहुल जगतापांची माघार; मुख्यमंत्र्यांच्या फोनची चर्चा!

कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहुल जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. जगताप यांनी स्वतःसह पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर पाचपुते समर्थकांनी हरकत घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल जगताप यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधल्याची माहिती समोर आली. कुकडी कारखान्याला मदतीचा शब्द दिल्याचीही चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर राहुल जगताप यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. समर्थकांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. या माघारीमुळे आमदार विक्रम पाचपुते यांचे बंधू प्रताप पाचपुते यांच्यासाठी राजकीय मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे.

मात्र, माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांची उमेदवारी कायम असल्याने या मतदारसंघातील संघर्ष संपलेला नाही. पानसरे यांच्याकडे मतांचा मोठा आधार असल्याचे सांगितले जात असून, पाचपुते-नागवडे यांच्या समीकरणांवर नाराज असलेले मतदार कोणती भूमिका घेतात, यावर या लढतीचे गणित ठरणार आहे.

गायकर-घुलेंची माघार; कौटुंबिक राजकीय गणितांना बळ!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सीताराम गायकर आणि चंद्रशेखर घुले पाटील यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतले. सलग दहा वर्षे संचालक म्हणून प्रतिनिधित्व केल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या उमेदवारीबाबत अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. घुले यांच्या माघारीमुळे शेवगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी राजश्री घुले पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. सीताराम गायकर यांनी अकोले सोसायटी मतदारसंघातून माघार घेतली असली, तरी त्यांच्या कन्येचा अर्ज कायम ठेवण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीतील माघारींच्या राजकारणात केवळ पक्षीय समीकरणेच नव्हे, तर समर्थक आणि कुटुंबीयांच्या उमेदवारीची गणितेही महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे.

नऊ जागांवर बिनविरोध; उर्वरित १२ जागांवर काट्याची लढत!

जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदांपैकी नऊ जागांवर बिनविरोध निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर सेवा संस्था मतदारसंघातून करण ससाणे, शेवगावमधून राजश्री घुले पाटील, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, राहात्यातून सुजय विखे पाटील, कोपरगावमधून बिपीन कोल्हे, संगमनेरमधून रंजीत देशमुख, नेवासामधून शंकरराव गडाख, शेती मतदारसंघातून सचिन जगताप आणि शेतीपूरक मतदारसंघातून आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगण्यात आले. या नऊ जागांमध्ये भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे तीन आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल असल्याची माहिती आहे. आता उर्वरित १२ जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. प्रचाराच्या काळात प्रत्येक गट आपली ताकद पणाला लावणार आहे. सहकारी संस्थांमधील मतांचे गणित, स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा, पक्षांतर्गत नाराजी आणि साखर कारखान्यांच्या राजकारणाचा प्रभाव या सगळ्यांचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुष्काळाचे कारण पुढे; राजकीय स्वार्थाचे गणित मागे!

जिल्ह्यात शेतकरी संकटात असताना त्यांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्याची भाषा केली गेली. पण बैठकांमधील चर्चा, उमेदवारांच्या याद्या, माघारींसाठी झालेली धावपळ आणि जागावाटपातील संघर्ष पाहता, नेत्यांना बँकेच्या भवितव्यापेक्षा आपापल्या राजकीय ताकदीची अधिक चिंता होती का, असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या, एकीचे आवाहन झाले; मात्र प्रत्यक्षात एकमताचा धागा कुणालाच पकडता आला नाही. बिनविरोधचा आग्रह धरणाऱ्यांनाच अखेर निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागत असल्याने या राजकीय नाट्याचा पडदा आता मतदानाच्या दिवशीच पडणार आहे. २ नोव्हेंबरला मतदार कोणाला कौल देतात, भाजपमधील कोणता गट वरचढ ठरतो आणि विखे-थोरात विरुद्ध शिंदे-लंके या संघर्षात कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे