Eknath Shinde : नगर : श्री क्षेत्र चौंडी ही मराठी संस्कृतीचे माहेरघर असून गेल्या ३०० वर्षांपासून ही भूमी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ‘गोदा ते नर्मदा’ यात्रेचा प्रवास केवळ भौगोलिक नसून तो आध्यात्मिक व सांस्कृतिक आहे. आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा व लोकभावनेचा सन्मान करत ही यात्रा राज्यातच नव्हे तर देशभर जलसंवर्धनाचा नवा संदेश देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पाण्याचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य या यात्रेतून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जामखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ या जलजागृती यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा : मजले चिंचोली येथील तरुणाचा एसआरपीएफ भरतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू
यांची उपस्थिती
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रामराव वडकुते, आमदार काशिनाथ दाते, आमदार विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, प्रवीण कोल्हे, देविदास महाराज, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, डॉ. विकासानंद महाराज मिसाळ, आदिनाथ शास्त्री महाराज, राम महाराज झिंझुर्डे, दयानंद महाराज कोरगावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की पहा : गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे अहिल्यानगरमध्ये जंगी स्वागत
लोककल्याणकारी राज्य (Eknath Shinde)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून स्वराज्याचा विस्तार केला. सुशासन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन आणि राष्ट्रनिर्मिती ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. २९ वर्षांच्या आदर्श शासनातून लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धन, धर्मशाळांची उभारणी, मंदिरांचे जीर्णोद्धार, नद्यांवर घाटांची निर्मिती, आदर्श करव्यवस्था तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना सवलती देऊन समाजहिताचे कार्य केले. त्या काळात महिला सक्षमीकरणालाही त्यांनी चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.



