EV Stations : नगर : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने राज्यभर ‘ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी प्रोत्साहन उपक्रम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, महिला उद्योजक, स्वयंसहायता गट, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच ग्रामीण भागातील इच्छुक उद्योजकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला तसेच आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
हेही वाचा : ३५ फूट उंच झाडावर लटकलेल्या कावळ्याची थरारक सुटका; अमित गायकवाड यांचे धाडस
चार्जिंग स्टेशन काळाची गरज
देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असल्याने आगामी काळात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे व्यापक जाळे उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांप्रमाणे विविध ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशनची उपलब्धता वाढविणे ही काळाची गरज आहे. या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असून, त्यांचा लाभ युवक, महिला आणि इच्छुक उद्योजकांनी घ्यावा, या उद्देशाने अमृतने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणी, संचालन आणि व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नक्की पहा : ६ लाख प्रामाणिक शिक्षकांच्या भविष्याशी खेळ! TET पेपर चक्क प्रिंटिंग प्रेसमधूनच लीक?
जाणून घ्या प्रक्रिया (EV Stations)
पात्र लाभार्थ्यांना अमृतच्या ‘वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा योजने’चा लाभ मिळू शकतो. त्यामुळे नवोदित उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे. युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयंसहायता गट, एमएसएमई उद्योजक, शेतकरी उत्पादक गट, ग्रामीण उद्योजक तसेच स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे नागरिक या उपक्रमासाठी पात्र राहतील. इच्छुकांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahaamrut.org.in येथे भेट देऊन ‘योजना’ विभागातील ‘EV Charging Station Partner’ या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ९११२२२८७६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



