Fake Currency Racket Busted : संगमनेर : शहरात आज (ता. ३) भरधाव वेगाने धावणाऱ्या एका संशयास्पद मोटारीच्या (car) पाठलागातून तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांच्या बनावट नोटांचा साठा उघडकीस (Fake Currency Racket Busted) आला. याप्रकरणी मयूर किशोर सिद्धपुरा (वय ३८, रा. गोविंदनगर, घटपुरी, ता. खामगाव, जिल्हा बुलढाणा) याला शहर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे, तर त्याचे साथीदार उमेश कांबळे (खामगाव, जिल्हा बुलढाणा) व संदीप धापटवार (नाशिक), शंकर गिरी (शेगाव, जिल्हा बुलढाणा) हे तिघे फरार झाले आहेत. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : पारनेरमध्ये स्नेहालय उडान प्रकल्पांतर्गत ‘माझी शाळा, बालविवाह मुक्त शाळा’ अभियान
संशयित मोटारीचा पाठलाग
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोटार भरधाव वेगाने शहरातून जात असताना तिने दुचाकीस्वाराला कट मारत वाहतूक नियमांची पायमल्ली केली. त्यानंतर नागरिकांनी मोटार रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वेग कमी न करता मोटार सुसाट पळवली. यावेळी एका व्यक्तीला कारचा धक्का लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही धाडसी तरुणांनी संशयित मोटारीचा पाठलाग सुरू केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच, आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर शहर पोलिसांनी मोटारीसह आरोपींना ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
तपासात या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न (Fake Currency Racket Busted)
मोटारीची झडती घेतली असता, बॅगांमध्ये ठेवलेल्या बनावट नोटांच्या बंडलांचा साठा आढळला. तपासात या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. प्रत्येक बंडलात वर आणि खाली एक-एक खरी नोट ठेवून मधोमध बनावट नोटा भरून फसवणुकीचा डाव रचण्यात आला होता. १२ लाख ४० हजार रुपयांच्या बनावट नोटांचा साठा उघडकीस आला. प्राथमिक तपासानुसार गोलू शंकर गिरी (शेगाव, जिल्हा बुलढाणा) यांच्या सांगण्यावरून या बनावट नोटा संगमनेरमध्ये एका व्यक्तीला देण्यासाठी आरोपी असल्याचे समोर आले.
याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्यासह बाबासाहेब सातपुते, विजय खुळे, सागर नागरे, संदीप कोंदे आणि सदाफळ बढे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. दरम्यान, पसार आरोपींचा शोध सुरू असून, या बनावट नोटांच्या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



