नगर : उपवासाची भगर ही जीवघेणी ठरली आहे. श्रीगोंदा आणि राहुरी फॅक्टरी परिसरात (Food poisoning in Shrigonda and Rahuri) परिसरात भगर खाल्ल्यानंतर तब्बल २५ ते ३० जणांना विषबाधा (25 to 30 people suffer from food poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. आता नेमकं काय घडलं? सविस्तर वाचा.
नक्की वाचा : श्रीरामपूर हादरले;‘जादुई दिव्या’ चा फंडा दाखवून व्यावसायिकाची सव्वा कोटीची फसवणूक
नेमकं काय घडलं? (Food poisoning in Shrigonda and Rahuri)

नवरात्रोत्सवानिमित्त उपवासासाठी भगर खाल्ल्यानंतर राहुरी परिसरातील सुमारे १० ते १५ जणांना त्रास झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने या सगळ्यांना राहुरी शहरासह राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव तिघांना पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात अनेक महिला व पुरुष नऊ दिवसांचे उपवास करतात. या काळात भगर हा उपवासातील प्रमुख खाद्यपदार्थ मानला जातो. मात्र, भगर खाल्ल्यानंतर अनेकांना इथे अचानक त्रास सुरू झाला. राहुरी शहर, येवले आखाडा, राहुरी स्टेशन आणि वाघाचा आखाडा परिसरातील नागरिकांना भगर खाल्यानंतर हा त्रास झाला.
येवले आखाडा येथील प्रा. बाळासाहेब जगन्नाथ जाधव आणि त्यांच्या मातोश्री सुमनबाई जगन्नाथ जाधव यांच्यासह अनेक रुग्णांवर राहुरी व राहुरी फॅक्टरी परिसरात उपचार सुरू आहेत. तर वाघाचा आखाडा येथील सुरेश पटारे यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यात सुद्धा असाच प्रकार घडला आहे.
अवश्य वाचा : जम्मू विमानतळावर थरार! नगरच्या भाविकांचा विमानात जीव टांगणीला
श्रीगोंद्यात काय घडलं? (Food poisoning in Shrigonda and Rahuri)
नवरात्रोत्सवानिमित्त उपवासासाठी भगरीच्या पिठाचे सेवन केल्याने श्रीगोंदा फॅक्टरी येथील १५ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले होते. या सगळ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, या प्रकारामुळे अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. तर श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका किराणा दुकानातून नागरिकांनी नवरात्रोत्सवाच्या उपवासासाठी भगर पिठाची खरेदी केली होती. त्याचे सेवन केल्यानंतर नागरिकांना थरथर कापणे, उलट्या, जुलाब व चक्कर येणे अशी लक्षणे जाणवू लागली.
त्यात सुनंदा शेळके, उज्चला शेजवळ, आरती राहुल सावंत, द्रौपदाबाई बाबर, गोपीचंद गोंडे, अमोल राऊत, सुनीता सुभाष बाबर व स्वप्नाली नाथा सावंत यांच्यासह एकूण १५ जण बाधित झाले होते. सर्वांना तातडीने श्रीगोंदा फॅक्टरी,श्रीगोंदा तसेच काष्टी व दौंड येथील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. सध्या सर्व बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. आता नागरिकांना ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली? हे अजून स्पष्ट झालेले नाही. आता या विषबाधेचे नेमके कारण प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल व चौकशीनंतरच समोर येणार आहे.



