Fraud : श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान परिसरात जादा परताव्याचे आमिष दाखवून एका कंपनीने हजारो तरुणांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना घडली आहे. यात फसवणुक झालेल्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून श्रीरामपूर तालुक्यासह (Shrirampur Taluka) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत टाकळीभान येथील सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (Somnath Waghchaure) यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करुन संबधीत कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा : संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत होणार संरक्षण उत्पादन संकुलाचे उद्घाटन; विखे यांची माहिती
कोट्यवधी रुपयांची फसवणूक
या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे की, टाकळीभान येथे एका आॕनलाईन शेअर्स कंपनीकडून टाकळीभान व परीसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. माझा मुलगा शेखर बापूसाहेब शिंदे (रा. टाकळीभान ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर) याची या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वेळोवेळी झुम ॲपद्वारे मिटींग (Fraud)
या कंपनीमार्फत माझ्या मुलास “बोन चॕट” या माध्यमातून विविध प्रकारचे मेसेज व चॅटिंग येत होते. त्या चॅटिंगद्वारे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी झुम ॲपद्वारे मिटींग आयोजित करण्यात येत होती. त्या मिटिंगमध्ये स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी व ट्रेडिंग सल्लागार म्हणून सांगून माझ्या मुलाचा विश्वास संपादन केला.
संपर्क टाळण्यास सुरुवात
त्यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलाने विविध तारखांना ऑनलाईन पद्धतीने पैसे गुंतविले. सुरुवातीला नफा मिळत असल्याचे दाखविण्यात आले; मात्र नंतर पैसे परत मिळणे बंद झाले तसेच संबंधित व्यक्तींनी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमच्या निदर्शनास आले की, हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.
एक हजार ६०० लोकांची आर्थिक फसवणूक
आरोपी यांनी संगनमताने खोटी माहिती, खोटे आश्वासन व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून घेतलेले आहेत. या ऑनलाईन कंपनीमार्फत टाकळीभान पंचक्रोशीमध्ये एक हजार ५०० ते एक हजार ६०० लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. सुरुवातीला सरासरी रुपये ३० हजार रुपये इतकी रक्कम गुंतवणूक म्हणून घेतली जात होती; मात्र अनेक व्यक्तींनी रुपये ९० हजार रुपये, १ लाख, ५ लाख, १० लाख, १५ लाख व त्यापेक्षाही अधिक रक्कम गुंतविलेली आहे.
या प्रकरणासंबंधी संबंधित आवश्यक पुरावे उपलब्ध
या प्रकरणामध्ये एकूण कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली असून, अंदाजे किमान रुपये १५ कोटीपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. या प्रकरणासंबंधी आमच्याकडे संबंधित माहिती, व्यवहाराचे स्क्रीनशॉट, बँक व्यवहार तपशील, मोबाईल नंबर व इतर आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत.
अनेक गरीब कुटुंबातील लोकांनी देखील त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतः ची व इतरांची गुंतवणूक केली असून त्यांची देखील आर्थिक फसवणूक झालेली आहे.
न्याय मिळवून देण्याची मागणी
त्यामुळे निष्पाप व फसवणूक झालेल्या लोकांना विनाकारण त्रास न देता स्थानिक मुख्य आरोपी व मुळ मास्टरमाइंड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदर कंपनीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करून सर्व पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा व फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून द्यावी ही विनंती करण्यात आली आहे.



