Gauri Ingawale ‘Dashmi’ Movie : रहस्य आणि स्त्रीशक्तीचा संगम; ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरी इंगवलेचा रौद्र अवतार

0
Gauri Ingawale 'Dashmi' Movie : रहस्य आणि स्त्रीशक्तीचा संगम; ‘दशमी’च्या गाण्यात दिसणार गौरी इंगवलेचा रौद्र अवतार

नगर :  रावणाचा अंत झाला, महिषासुराचा संहार झाला पण आजच्या युगातील अन्याय आणि अधर्माचं काय? या विरोधात आज कोण उभं राहणार? कोण याचा सर्वनाश करणार? या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर घेऊन ‘दशमी’ (Gauri Ingawale ‘Dashmi’ Movie) हा मराठी चित्रपट ऑक्टोबर महिन्यात रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे. या चित्रपटातील ‘चंडिका हो’ (Chandika Ho song) या गाण्यातला अभिनेत्री गौरी इंगवलेचा ‘दुर्गा अवतार’ चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की वाचा : नाना पाटेकर यांचा रात्री २:३० वाजता मित्राला मेसेज ; डॉक्टरांनी सांगितलं शेवटच्या तासांत काय घडलं?

गौरी इंगवलेचा शृंगार नेमका कसा? (Gauri Ingawale ‘Dashmi’ Movie)

अंगावर लाल वस्त्र, कपाळी कुंकवाचा मळवट, गळ्यात कवड्याची माळ, तीक्ष्ण नजर आणि  हातात अधर्माविरुद्ध  लढण्यासाठी निर्धाराने पेटलेली ज्योत अशा प्रभावी रूपात गौरी दिसणार आहे. स्त्रीशक्ती, अन्यायाविरोधातील लढा आणि आदिशक्तीचा जागर यांचा थरारक मिलाफ या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. सुरेश पंडित यांनी  लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला जसराज जोशी यांचा स्वरसाज लाभला आहे.

गौरी इंगवलेच्या या रूपातून ‘दुर्गा म्हणजे केवळ पूजनीय शक्ती नाही, तर अन्यायाच्या विरोधात उभी राहणारी ताकद आहे’, हा आशय अधोरेखित होतो. गाण्यातील तिचा रौद्र, गूढ आणि सामर्थ्यशाली अंदाज ‘दशमी’ च्या कथानकाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.

अवश्य वाचा : ध्रुव राठीसह अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात? नेमकं काय घडलं?

‘दशमी’ चित्रपटात कलाकार कोण? (Gauri Ingawale ‘Dashmi’ Movie)

२३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या‘दशमी’ चित्रपटात गौरी इंगवले, मकरंद अनासपुरे, विजय निकम, महेश मांजरेकर, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन यांच्यासोबत दाक्षिणात्य स्टार रवि प्रकाश महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ या पारंपरिक विचाराला आजच्या सामाजिक वास्तवाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ‘दशमी’ केवळ मनोरंजन करणारा थरारक चित्रपट न राहता, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि स्त्रीशक्तीला नवी ताकद देण्याचा संदेश देताना दिसणार आहे.