Ghatghar Hydroelectric Project : भीमाशंकरसारखा अहिल्यानगरमध्ये १८ वर्षांपूर्वीच तयार झाला होता जलविद्युत प्रकल्प;किती वृक्ष तोडली?

0
Ghatghar Hydroelectric Project : भीमाशंकरसारखा अहिल्यानगरमध्ये १८ वर्षांपूर्वीच तयार झाला होता जलविद्युत प्रकल्प;किती वृक्ष तोडली ?

अकोले : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पर्यावरण क्षेत्रात मोठं रणकंदन सुरु आहे. या प्रकल्पात ३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्यात येणार आहेत, तर त्यातली काही झाडे ही तोडली आहेत. मात्र भीमाशंकरमध्ये (Bhimashankar Project) होणाऱ्या या प्रकल्पासाठी बेसुमार वृक्षतोड करावी लागतेय. मात्र तुम्हाला माहित आहे का आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा १८ वर्षांपूर्वी असाच एक प्रकल्प सुरु झाला होता. आता हा प्रकल्प नेमकं काय (Ghatghar Hydroelectric Project) आहे आणि या प्रकल्पासाठी किती वृक्षतोड झाली होती ते जाणून घेऊ….

नक्की वाचा : रब्बी ज्वारीसाठी मिळणार मोफत बियाणे; १० नोव्हेंबरला होणार वाटप

घाटघर प्रकल्प नेमका काय? (Ghatghar Hydroelectric Project)

महाराष्ट्रातील पहिला उदंचन जलविद्युत प्रकल्प अहिल्यानगर-ठाणे सरहद्दीवरील अकोले तालुक्यातील घाटघर येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये (कोकणकड्याच्या जवळ) १८ वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. २५० मेगावॅटचा हा प्रकल्प २००८ सालापासून अविरत सुरू आहे. हा पारंपारिक धरणांसारखा फक्त पाणी सोडणारा प्रकल्प नाही. तर यात पाण्याचा पुनर्वापर करून वीज निर्माण केली जाते. विशेष बाब म्हणजे  या प्रकल्पाची धरणे बांधण्यासाठी ‘रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट’ या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, हे तंत्रज्ञान वापरणारा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. आणि भविष्यात या प्रकल्पाची क्षमता ३७५ मेगावॅट होणार आहे.

अवश्य वाचा : पत्नी, तिचा प्रियकर यांच्या त्रासामुळे पतीने संपविले जीवन; मिरजगाव येथील घटना

डोंगराळ भागातील बांधकामामुळे वनक्षेत्राला थोडाफार फटका बसला असला तरी कमीत कमी निसर्गाची हानी करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती. सध्या रायगडमध्ये जलविद्युत प्रकल्पाला विरोध होत असला तरी अहिल्यानगरमध्ये १८ वर्षापूर्वीच हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. रायगड जिल्ह्यातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात टॉरेंट पॉवरचा पंप स्टोरेजच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. यासाठी मोठी नैसर्गिक हानी होत असल्याने या प्रकल्पाला सध्या विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील घाटघर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी ही कमीत कमी नैसर्गिक हानी करून झाल्याचे पाहायला मिळाले. खडकाळ आणि पाणथळ भाग असल्याने वृक्षतोड झाली नसल्याचे इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिम टोकाला घाटघर येथे १९९५ साली उदंचन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याची चर्चा सुरू झाली होती. घाटघर येथे प्रवरा नदी खोऱ्यात ५.८७ दशलक्ष घनमीटर क्षमतेचा अप्पर डॅम आणि शहापूर तालुक्यात चोंढे येथील शाई नाला (उल्हास नदीची उपनदी, जि. ठाणे) येथे ३.८० दशलक्ष घनमीटर क्षमतेचा लोअर डॅम बांधण्यात आला. तीव्र उताराच्या बोगद्यातून हे पाणी खाली कोकणात सोडले जाते आणि वीज तयार होते. ही तयार होणारी वीज मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात वीज वापरली जाते. तसेच विजेची गरज नसेल तेव्हा पाणी पुन्हा अप्पर डॅममध्ये आणले जाते. या प्रकल्पामुळे गोदावरी खोऱ्याचे पाणी कोकणात वळवले जाते.

घाटघरच्या प्रकल्पात वीज निर्मिती कशी होते? (Ghatghar Hydroelectric Project)

घाटघर कोकणकड्याच्या पोटात (भुयारात) हे विद्युतगृह उभारण्यात आले आहे. विजेची मागणी जास्त असताना, या प्रकल्पातील वरच्या जलाशयातील पाणी भुयारी दाबाच्या बोगद्यातून खाली सोडून १२५ मेगावॅटचे दोन टर्बाइन फिरवले जातात आणि वीज तयार केली जाते. रात्रीच्या वेळी किंवा विजेची मागणी कमी असताना, तेच पाणी खालच्या जलाशयातून उलट्या दिशेने टर्बाइन फिरवून (पंप करून) पुन्हा वरच्या जलाशयात पंप केले जाते. यामुळे पाण्याचा आणि ऊर्जेचा प्रभावीपणे पुनर्वापर होतो आहे.

अलीकडेच या प्रकल्पाची क्षमता ५० टक्क्यांनी वाढवण्यासाठी महावितरण/महाजेनको आणि इतर संस्थांमध्ये सामंजस्य करार झाले आहेत, ज्यामुळे भविष्यात येथील वीजनिर्मिती आणखी वाढणार आहे. म्हणजेच २५० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी १२५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता ३७५  मेगावॅट होणार आहे.

एका बाजूला रायगडमधील प्रकल्पासाठी ३२ हजारांहून अधिक झाडे तोडली जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमींचा मोठा विरोध होत आहे; तर दुसरीकडे, १८ वर्षांपूर्वी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील घाटघर येथे कोणत्याही मोठ्या नैसर्गिक हानीशिवाय आणि फार वृक्षतोड न करताही असा यशस्वी प्रकल्प उभा राहू शकतो, हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे. त्यामुळे विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल कसा राखायचा, याचं उत्तम उदाहरण घाटघरचा प्रकल्प आहे.