India Post : अहिल्यानगर : भारतीय डाक विभागाच्या (India Post) वतीने नागरिकांना अधिक सुलभ, जलद, आधुनिक व दर्जेदार टपाल तसेच वित्तीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा न्यायालय (District Court) परिसर, अहिल्यानगर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय पोस्ट ऑफिसचे (Post Office) उद्घाटन प्रीती अग्रवाल (IPoS) पोस्टमास्टर जनरल पुणे क्षेत्र, पुणे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
भारतीय डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित
या उद्घाटन समारंभास मा. श्री. एस. बी. कचरे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, अहिल्यानगर तसेच मा. डॉ. दिलीप टिपरसे, उपपोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय न्यायालयातील न्यायिक अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, बार असोसिएशनचे पदाधिकारी, अधिवक्ते, न्यायालयीन कर्मचारी, भारतीय डाक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले (India Post)
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिसची पाहणी करण्यात आली. मान्यवरांनी पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक सुविधा, ग्राहकाभिमुख सेवा तसेच नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले.

यावेळी मार्गदर्शन करताना पोस्टमास्टर जनरल सौ. प्रीती अग्रवाल यांनी भारतीय डाक विभाग हा देशातील सर्वात विश्वासार्ह सार्वजनिक सेवा पुरविणारा विभाग असून बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जिल्हा न्यायालय परिसरात सुरू करण्यात आलेले हे पोस्ट ऑफिस न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, अधिवक्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतीय डाक विभागामार्फत उपलब्ध असलेल्या बचत बँक, आधार सेवा, स्पीड पोस्ट, पार्सल, नोंदणीकृत टपाल, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI), इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि इतर वित्तीय सेवांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. कचरे यांनी न्यायालय परिसरात पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे न्यायालयीन कामकाजाशी संबंधित पत्रव्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित व वेळेवर होण्यास मोठी मदत होईल, तसेच न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी, अधिवक्ते आणि नागरिकांना विविध टपाल व बँकिंग सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचतील, असे मत व्यक्त केले.
नवीन पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल बुकिंग, बचत बँक व्यवहार, आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स तसेच भारतीय डाक विभागाच्या इतर सर्व महत्त्वाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालय परिसरातील नागरिकांना विविध सेवांसाठी शहरातील इतर पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
कार्यक्रमाचे आयोजन विकासजी पालवे (IPoS), वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहिल्यानगर विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, अधिवक्ते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. जिल्हा न्यायालय पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नागरिकांना अधिक प्रभावी, विश्वासार्ह आणि सहज उपलब्ध टपाल व वित्तीय सेवा देण्याच्या भारतीय डाक विभागाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.



