
नगर : आपल्या विनोदी शैलीतून गेली साडे तीन दशके कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाजाच्या व्यंगांवर भाष्य करून प्रबोधन करणारे लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (Indurikar Maharaj) म्हणजेच इंदुरीकर महाराज. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक म्हणून त्यांची ओळख आहे. एरवी व्हीडिओ शूटिंग करणाऱ्या माणसांना व्हिडिओ सुद्धा न काढू देणाऱ्या इंदुरीकर महाराज यांनी प्रथमच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत (Interview)दिली. या मुलाखतीत त्यांनी अवघ्या २० रुपयात त्यांचं लग्न (Wedding for 20 Rupees) कसं झालं? तसेच इतरही अनेक किस्से सांगितले आहेत.
इंदुरीकर महाराजांनी नेमकं काय सांगितले? (Indurikar Maharaj)

इंदुरीकर महाराज म्हणाले की, माझ्या वडिलांचे वय झाले होते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोरच माझे लग्न व्हावे,असे त्यांना वाटायचे,माझे लग्न जमल्यानंतर केवळ आठ दिवसांत लग्नसोहळा आटोपला. संगमनेरातील दाढ येथील एका मंदिरात माझे लग्न झाले. माझी बायको अतिशय गरीब घरातली होती. गरिबाचीच मुलगीच बायको म्हणून करायची,असे माझे आधीपासूनच ठरले होते. दोन कीर्तनाच्या मध्ये माझे लग्न झाले. माझ्या लग्नाला फक्त २० रूपये खर्च आला. २० रुपयांच्या दोन हारांमध्ये माझे लग्न झाले,असा किस्सा इंदुरीकर महाराज यांनी सांगितला. तसेच लग्नाच्या दिवशीही मी दोन कीर्तने केल्याची आठवणही त्यांनी सांगितली. मजेशीर गोष्ट म्हणजे, बायकोही कीर्तनकार असल्याने तिनेही लग्नाच्या दिवशी रात्री एक कीर्तन केले, असही त्यांनी सांगितले.
इंदुरीकर महाराज यांचं शिक्षक काय? (Indurikar Maharaj)
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी हे महाराजांचे गाव. ते स्वत: बीएस्सी बी.एड झालेले. काही वर्षे विना अनुदानित शाळेवर शिक्षण म्हणून नोकरी केल्यानंतर घरातले आध्यात्मिक वातावरण पाहून ते कीर्तनसेवेकडे वळाले. गेली तीन दशके त्यांनी कीर्तनसेवेतून समाजाच्या विविध प्रश्नांवर प्रबोधन केले. यातूनच पुढे समाज प्रबोधनकार ही उपाधी त्यांना मिळाली. इंदुरीकर महाराज यांनी प्रथमच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
या मुलाखतीत त्यांनी आतापर्यंत न सांगितलेले अनेक किस्से सांगत आयुष्याचा प्रवास उलगडला आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, माझा जन्म अहिल्यानगरच्या आदिवासी असलेल्या अकोले तालुक्यातला. ग्रामीण भागाशी माझा लहानपणापासून संबंध होता. त्यामुळे ग्रामीण बाज माझ्यामध्ये लहानपणापासूनच होता. ग्रामीण बोली माझ्या अंगवळणी पडली. कृत्रिम गोष्टी फार काळ टिकत नाहीत. नैसर्गिक गोष्टी नष्ट होत नाहीत. तसेच माझ्या कीर्तनशैलीचे आहे. माझी कीर्तनशैली ग्रामीण बोलीची आणि विनोदी शैलीची आहे, असे इंदुरीकर महाराजांनी सांगितले.
त्यावेळी वाटले नव्हते की, हीच भाषा पुढे लोकांना आवडेल,प्रभावी ठरेल,असेही इंदुरीकरांनी नमूद केले. जी गोष्ट व्यक्तीच्या हृदयाला भिडते आणि संबंधित माणूस त्या गोष्टीला आपल्याशी जोडतो, त्यावेळी तो माणूस मी दिलेल्या उदाहरणावर खळखळून हसतो. कारण त्याच्यात नैसर्गिकपणा असतो, मी या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. माझ्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडल्या असल्याने तीच उदाहरणे मी कीर्तनात देतो, त्यावेळी लोक खळखळून हसतात, असेही इंदुरीकरांनी सांगितल आहे.


