Kharif Crop Competition 2026 : अहिल्यानगर : राज्यातील अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने सन 2026-27 च्या खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीक स्पर्धा (Kharif Crop Competition) जाहीर केली आहे. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अर्ज प्रक्रिया प्रथमच पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून, राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरांवर होणार स्पर्धा (Kharif Crop Competition)
ही स्पर्धा सर्वसाधारण आणि आदिवासी अशा दोन्ही गटांसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण अकरा पिकांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
उत्पादकतेच्या आधारे होणार विजेत्यांची निवड (Kharif Crop Competition)
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मूग आणि उडीद पिकांसाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करता येणार आहेत. तालुकास्तरावरील उत्पादकतेच्या आधारे जिल्हा आणि त्यानंतर राज्यस्तरावरील विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यापूर्वी पीक स्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पडत होती. मात्र, अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता, वेग आणि सुलभता आणण्यासाठी यंदापासून स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे अर्ज सादर करणे तसेच त्यांची पडताळणी अधिक परिणामकारक होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
या स्पर्धेचा उद्देश केवळ अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करणे एवढाच नसून, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हाही आहे. यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगरात प्लास्टिकविरोधी कारवाईला वेग; महिनाभरात 365 किलो प्लास्टिक जप्त
सहभागासाठी आवश्यक अटी
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे संबंधित शेती असणे आणि ती स्वतःच्या कसणीत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठीही अर्ज करता येणार आहे. मात्र, भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर इतर सर्व पिकांसाठी 40 गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे बंधनकारक आहे.
अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याचा पुरावा, आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र तसेच बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची प्रत सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज भरून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
हेही वाचा: अहिल्यानगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसाठी मुंबईत बैठक



