Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू; ‘१३२’ क्रमांकाची वितरिका मात्र पाण्याविना कोरडीठाक

उभ्या पिकांना तातडीने पाण्याची गरज

0
Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू; '१३२' क्रमांकाची वितरिका मात्र पाण्याविना कोरडीठाक
Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू; '१३२' क्रमांकाची वितरिका मात्र पाण्याविना कोरडीठाक

Kukadi Project : श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातून (Kukadi Project) पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लोचे आवर्तन (Overflow cycle) सुरू आहे. दुसरीकडे मात्र कुकडी डाव्या कालव्यावरील ‘१३२’ क्रमांकाची अत्यंत महत्त्वाची वितरिका अद्यापही पाण्याविना कोरडीठाक पडली आहे. ऐन पावसाळ्यातही पुरेसा पाऊस नसल्याने आणि वितरिका सुरू न झाल्याने सात गावांमधील पिके करपण्याच्या मार्गावर आली आहेत. पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) या ढिसाळ नियोजनामुळे बळीराजाची “पाणी उशाशी अन् कोरड घशाशी” अशी बिकट अवस्था झाली असून, संतप्त शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा करण्याचा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : विना नोंदणीकृत साठेखत तयार करत दोन महिलांची फसवणूक; कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाण्याचा मोठा खेळखंडोबा

१३२ क्रमांकाची ही वितरिका आकाराने मोठी असून यावर परिसरातील सुमारे सात गावांतील मोठे कृषी क्षेत्र अवलंबून आहे. मात्र, मुख्य कालव्यावरून या वितरिकेला पुरेसा पाण्याचा विसर्गच केला जात नाही. परिणामी, ही वितरिका पूर्ण क्षमतेने धावत नाही आणि शेवटच्या टेल क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचतच नाही. उन्हाळी रोटेशनदरम्यानही पाटबंधारे विभागाच्या अपयशी नियोजनामुळे पाण्याचा मोठा खेळखंडोबा झाला होता. आता तर भर पावसाळ्यातही या वितरिकेच्या परिसरातील उद्भव पाण्याअभावी कोरडी झाली आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

उभ्या पिकांना तातडीने पाण्याची गरज (Kukadi Project)

सध्या लाभ क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना तातडीने पाण्याची गरज आहे. एका बाजूला कुकडी पाटबंधारे कार्यालय शेतकऱ्यांकडून पाण्याचे अर्ज भरून घेण्याच्या तयारीत व्यस्त आहे, तर दुसऱ्या बाजूला धरणातून अतिरिक्त पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहून जात आहे. अशी परिस्थिती असतानाही १३२ वितरिकेत पाणी सोडण्यास पाटबंधारे विभाग टाळाटाळ का करत आहे? धरण पूर्ण भरलेले असताना हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवेळी रस्त्यावर का उतरावे लागते? असे थेट सवाल या भागातील शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत.

आंदोलन छेडण्याचा इशारा

पाटबंधारे विभागाने कोणतीही टाळाटाळ न करता १३२ वितरिका त्वरित पूर्ण क्षमतेने सुरू करून टेलपर्यंत पाणी पोहोचवावे, अशी जोरदार मागणी होत आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर या खालील गावांतील शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे. या प्रकरणी अधिक माहिती साठी श्रीगोंदा उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ नाही.