Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

पाच शिफारशी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित

0


Mahatma Phule Agricultural University: राहुरी: जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41 व्या वार्षिक बैठकीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Agricultural University) बियाणे विभागातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पीक शास्त्र) डॉ. डि.के. यादव आणि जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.एन. त्रिपाठी यांच्या शुभहस्ते व नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. पी.आर. चौधरी, उत्तर प्रदेशातील मऊ येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. ए. आनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नरेंद्र काशीद, बियाणे संशोधन अधिकारी डॉ. सुरेश झांजरे, डॉ. कैलास भोईटे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अविनाश कर्जुले, डॉ. रश्मी भोगे, डॉ. कैलास गागरे आणि डॉ. दीपक गायकवाड यांनी स्वीकारला.

अवश्य वाचा- आता वाहनधारकांची खैर नाही! ‘ही’ गोष्ट न केल्यास थेट हजार रुपये दंड, परिवहन मंत्र्यांचा इशारा

पाच शिफारशी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित (Mahatma Phule Agricultural University)

या वार्षिक आढावा बैठकीत बियाणे रोगशास्त्र विषयातील दोन, बियाणे प्रक्रिया या विषयातील एक, बीजोत्पादन व प्रमाणिकरण या विषयातील एक, बियाणे कीटकशास्त्र या विषयातील एक अशा एकूण पाच शिफारशी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. या आधी या बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेने राष्ट्रीय स्तरावर 68 तर राज्य स्तरावर 27 तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्या आहेत. या योजनेस तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे. बीजोत्पादनातील विविध अडचणी समोर ठेवून त्यासंदर्भातील नियोजन व संशोधन कार्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार यांचे बहुमोल मार्गदर्शन व बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात केलेल्या संशोधनकार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.