Mahayuti Dispute in Parner : पारनेर महायुतीत मिठाचा खडा; ‘फालतूगिरी’पासून ‘बिनडोक’ वक्तव्यांपर्यंत रंगलेला सामना लंकेंच्या पथ्यावर

0
Mahayuti Dispute in Parner : पारनेर महायुतीत मिठाचा खडा; ‘फालतूगिरी’पासून ‘बिनडोक’ वक्तव्यांपर्यंत रंगलेला सामना लंकेच्या पथ्यावर
Mahayuti Dispute in Parner : पारनेर महायुतीत मिठाचा खडा; ‘फालतूगिरी’पासून ‘बिनडोक’ वक्तव्यांपर्यंत रंगलेला सामना लंकेच्या पथ्यावर

Mahayuti Dispute in Parner : नगर : पारनेरमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत महायुतीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्येच शाब्दिक वाद झाला. विकासकामांच्या उद्घाटनासाठी उभारलेला मंच पदाधिकाऱ्यांमधील श्रेयवादाचा आखाडा बनला. यावेळी ‘फालतूगिरी’, ‘दाखवून देईन’, ‘कच्च्या गुरूचा चेला नाही’, ‘बिनडोक’ आणि ‘वॉर्निंग’ अशा शब्दांचा वापर करत आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी आमदार दाते यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र, या वादाची चर्चा जिल्हाभर सुरू होती.

हे पहा – कंटेनरच्या धडकेने घडला भीषण अपघात; उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू

नेमकं घडलं काय?

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यात विकासकामांच्या श्रेयावरून वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, या घटनेच्या आदल्याच दिवशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीतील कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहण्याचा सल्ला दिला होता.

नक्की वाचा : धीरज परदेशी हत्याप्रकरणातील आरोपींचे घर पाडण्यासंबंधी न्यायालयाचा मोठा आदेश

लंके समर्थकांकडून भांडवल (Mahayuti Dispute in Parner)

दरम्यान, या वादानंतर कोरडे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी अशोक सावंत यांच्या पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करत पुतळा दहन केले. त्यामुळे पारनेरमधील महायुतीतील अंतर्गत धुसफूस अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. या संपूर्ण वादाचा राजकीय फायदा घेण्यास शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी सुरुवात केली आहे. पारनेरमध्ये लंके हे भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे विरोधक असल्याने महायुतीतील या संघर्षामुळे त्यांच्या समर्थकांना राजकीय संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.