
MIDC Police Station : नगर : फेसबुकवरील (Facebook) ट्रॅक्टर खरेदी-विक्री पेजवर भाड्याने ट्रॅक्टर पाहिजे अशी पोस्ट टाकून दरमहा भाडे देण्याचे आमिष दाखवत ट्रॅक्टर मालकांचा विश्वास संपादन करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून नऊ लाख रूपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत.
भाडे न देता ट्रॅक्टरची लावली विल्हेवाट
मल्हारी गहिनीनाथ जायभाये (वय ३२, रा. थाटे, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बापुसाहेब नानासाहेब शिंदे (रा. खांबे, ता. संगमनेर, सध्या रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी मल्हार जायभाये याने विजप्रवाहाच्या तारा ओढण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्याची मागणी केली. दरमहा भाडे देण्याचे आश्वासन देत त्याने शिंदे यांचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर भाडे न देता ट्रॅक्टरची विल्हेवाट लावत विश्वासघात केल्याचे समोर आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपीचा शोध लावून ट्रॅक्टर हस्तगत (MIDC Police Station)
सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तपास पथकाला संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शोधमोहीम राबवून मल्हार जायभाये याला अटक केली. त्याच्याकडून फिर्यादीचा ट्रॅक्टर हस्तगत केला. तपासादरम्यान संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक फसवणूक केल्याचे उघड झाले. फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातूनच प्रदीप काशिनाथ जगताप (रा. भरगाव, ता. वैजापूर) यांच्याशी संपर्क साधून त्यांचाही विश्वास संपादन केला होता. तो ट्रॅक्टरही जप्त केला.


