Pandharpur Cycle Wari : नगर : अहिल्यानगर सायकलिस्ट असोसिएशनच्या (Ahilyanagar Cyclists Association) वतीने व आय लव्ह नगरच्या (I Love Nagar) सहकार्याने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक पंढरपूर सायकल वारीचे (Pandharpur Cycle Wari) यंदा अत्यंत उत्साहात प्रस्थान झाले. ही वारी उद्या पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. यावर्षी सामाजिक जागृतीसाठी नागरिक आचारसंहिता म्हणजेच सिव्हीक सेन्स अवेअरनेस (Civic Sense Awareness) ही संकल्पना घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे संदेश देत जनजागृती करण्यात येणार आहे.

शनिवारी सकाळी भुईकोट किल्ल्याजवळील आय लव्ह नगर गार्डनपासून सायकल वारीची सुरुवात झाली. ‘आय लव्ह नगर’ व ‘लेट्सअप’चे कार्यकारी संपादक विजयसिंह होलम व मनोज यनगंदूल यांनी सायकल वारीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले. सर्व सहभागी सायकलिस्टनी हरीनामाचा गजर करत सायकल वारीसाठी जल्लोषात प्रस्थान केले.
यंदाचे सायकल वारीचे 8 वे वर्ष
अध्यात्म व पर्यावरण यांच्या संगमयुक्त भक्तीरसमय वातावरणात ही वारी निघते. नगरमधून निघून मिरजगाव, करमाळा मार्गे टेंभुर्णी. टेंभुर्णी येथे सायकलवारीचा मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी टेंभुर्णी ते पंढरपूर असा प्रवास असेल. पंढरपूरला नगर प्रदक्षिणा व रिंगणसोहळा होईल. त्यानंतर विठ्ठल दर्शन होऊन वारी परतीचा प्रवास सुरू करणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सिव्हीक सेन्स बाबत जनजागृती (Pandharpur Cycle Wari)
यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे सायकलवारी बरोबरच सामाजिक जागृतीसाठी नागरिक आचारसंहिता म्हणजेच सिव्हीक सेन्स अवेअरनेस अशी संकल्पना घेतली आहे. सायकलिस्ट दरवर्षीप्रमाणे स्वच्छतेचे नियम पाळतात. मात्र, यावर्षी इतरांनाही यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. नागरिकांच्या हक्काची अधिकाराची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्वच्छता, ध्वनीप्रदूषण टाळणे, वाहतूक नियम पाळणे या गोष्टी नियमितपणे पाळायच्या आहेत व इतरांनाही त्याबाबत जागृत करायचे आहे. असा संदेश देण्यात येणार आहे.
यावर्षी 32 सदस्य सहभागी झाले आहेत. 18 वर्षापासून ते 66 वर्षे वयाचे सदस्यांचा यात समावेश आहे. 10 सदस्य पन्नासी ओलांडलेले आहेत. यामध्ये व्यावसायिक, शिक्षक, सीए, विद्यार्थी अशा सर्व प्रकारच्या सदस्य सहभागी आहेत. यातील अनेकांची ही 5 ते 6 वी सायकलवारी आहे.
या वारीत चंद्रशेखर मुळे, विजय सांगळे, हनीश नवलानी, भागा बाबुराव नवले, मनोज येनगंदूल, शौनक खराडे, अनिल लोखंडे, नवनाथ मदने, अविनाश गायकवाड, जगबीरसिंग सिरोही, गणेश बनकर, जयेश पितळे, सोमनाथ निर्मळ, ज्ञानेश्वर जगताप, योगेश्वर खैरे, प्रसाद कोरडे, अनिल पाटरे, शेख सलीम सत्तार, त्र्यंबक नेटके, मोहन भोंबे, विनय बलभीम मुळे, आशिष एस. तट्टू, रवींद्र दरेकर. मनोज इंगळे, केतन बालदोटा, प्रसाद भंडारी, नागेश ढसाळ, श्रीपाद कुलकर्णी, सुधाकर लोंढे, बाळासाहेब परभणे व कल्याण बागरेचा हे सदस्य सहभागी झाले आहेत.



