नगर : राज्यासह देशभरात गाजलेले प्रकरण म्हणजे वादग्रस्त आणि बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) प्रकरण. यूपीएससी (Upsc Exam) नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याने याच पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवेत जायच्या आधीच अधिकारपदाचा मिजास, नंतर कागदपत्रांचं गौडबंगाल असे एक नव्हे अनेक कारनामे. मात्र तिच्यासोबत तिचे आई वडील म्हणजे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर (Puja Khedkar Father) हे सुद्धा विविध गंभीर कायदेशीर प्रकरणांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेत. आता पुन्हा पूजा खेडकर हिचे वडील व सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव (Bhalgaon) येथील निवासस्थानी काल मंगळवारी पहाटे नाशिक व अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाच्या (एसीबी) पथकाने छापा (ACB team raid) टाकला आहे. या छाप्यात अधिकाऱ्यांना जे सापडलं ते चक्रावून टाकण्यासारखे आहे.
नक्की वाचा : निकषांत न बसणाऱ्या तालुक्यांनाही मिळणार मदत; राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय
नेमकं काय घडलं? (Puja Khedkar Father)

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीप खेडकर यांच्या भालगाव येथील निवासस्थानी छापा टाकला असता अधिकाऱ्यांनी घरातील कागदपत्रे तर ताब्यात घेतलीच आहेत, मात्र यासोबत खेडकर परिवाराकडे उत्पन्नापेक्षा सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे त्यांना आढळून आले आहे. याप्रकरणी दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नी डॉ. मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच दिलीप खेडकरांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी तक्रार अहिल्यानगर येथील पंढरीनाथ शंकर साबळे यांनी २०१२ साली केली होती. आणि याच तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
खेडकर यांनी १९९५ ते २०२३ या कालावधीत केलेल्या व्यवहाराची तपासणी या पथकाने केली. उघड चौकशीत माहित असलेल्या उत्पन्नाच्या १०२ टक्के अधिकची बेहिशेबी मालमल्ला संपादित केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक आणि अहिल्यानगरच्या लाचलुचपत पथकांनी एकाचवेळी विविध ठिकाणी कारवाई केली. १३ कोटी ३० लाखाच्या बेहिशोबी मालमत्ता आणि खर्चाबाबत चौकशी खेडकरांकडे करण्यात आली आहे.
मंगळवारी पहाटे एकाच वेळी छापे टाकल्याने पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली होती. या कारवाईसाठी ३० हून अधिक अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप खेडकरांच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार, शिरूर कासार या ठिकाणी स्थावर मालमत्ता असल्याचे मिळालेल्या कागदपत्रांवरून समजलं आहे.
अवश्य वाचा : ‘वंशाचा दिवा’ नव्हे, विचारांची मशाल! श्रीगोंद्यात आईच्या पार्थिवाला मुलींचा खांदा
दिलीप खेडकर नेमके कोण? (Puja Khedkar Father)
दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. बी ई (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर यांनी सनदी अधिकारी म्हणून राज्य शासनातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. खेडकर सेवानिवृत्त होताच त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना १३ हजार ७४९ मते मिळाली होती. दिलीप खेडकर यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ४० कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केलं होतं. त्यानंतर एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते, याबाबत राजकीय चर्चा रंगल्या होत्या.
विशेष म्हणजे दिलीप खेडकर यांची पत्नी डॉ.मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. मनोरमा यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील सनदी अधिकारी होते. त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती. त्यांचे एकदा निलंबन झाले होते. खेडकर यांना दोन अपत्य आहेत. पियुष खेडकर आणि पूजा खेडकर. पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. तर पूजा खेडकर आता आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.



