
नगर : पुण्यातील (Pune Fraud News) प्रसिद्ध सराफ रांका ज्वेलर्स (Ranka Jewelers) यांच्या लक्ष्मी रोडवरील दुकानात तब्बल ४२ वर्षे काम करीत असलेल्या मॅनेजरने इतरांच्या मदतीने तब्बल १२ हजार ८०० ग्रॅम सोन्याचे दागिने व ७२ लाख रुपये रोख अशी तब्बल १८ कोटी ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे या गुन्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील केडगावमधील एक महिला (A woman from Kedgaon) आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
नक्की वाचा: जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!
खंडणी विरोधी पथकाने अहिल्यानगरमधून सराफ दुकानातील मॅनेजरसह तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात कोंढवा येथील प्रशांत कांतीलाल बर्मेचा, केडगावमधील रमाकांत महादेव पराळे आणि मधु ऊर्फ महेश्वरी रमाकांत पराळे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत श्रेयस अशोक रांका यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात २३ एप्रिल २०२६ रोजी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ ऑक्टोंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ दरम्यान घडला आहे.
अवश्य वाचा: मोठी बातमी! नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन
नेमकं घडलं काय? (Pune Fraud News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत कांतीलाल बर्मेचा हा रांका ज्वेलर्समध्ये गेल्या ४२ ते ४४ वर्षांपासून कामाला आहे. १९९२ मध्ये रांका यांनी लक्ष्मी रोडला दुकान सुरु केल्याने बर्मेचा याची तेथे बदली करण्यात आली. प्रशांत बर्मेचा हा अनुभवाने ज्येष्ठ असल्याने त्याला कंपनीने मॅनेजर म्हणून जबाबदारी दिली होती. त्याच्या कामावर विश्वास ठेवून कंपनीने प्रशांत बर्मेचा याला सोने पुरवठादार व ग्राहक यांच्याकडून सोन्याचे दागिने खरेदी विक्रीची जबाबदारी दिली होती.
मात्र मार्च २०२६ मध्ये वार्षिक ऑडिट कामी स्टॉक व्हेरिफिकेशन करताना या अनुभवी मॅनेजरचे भांड फुटलं आणि ऑडिट करताना १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ७२ लाख रुपयांचा हिशोबच लागला नाही. त्याबाबत दुकानात चौकशी केली असता दुकानातील प्रशांत कांतीलाल बर्मेचा याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम ही केडगावमध्ये राहणाऱ्या कविता रमाकांत पराळे यांना देऊन आपली फसवणूक केल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी कविता पराळे, त्यांची मुलगी महेश्वरी व पती रमाकांत पराळे हे दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांची प्रशांत बर्मेचा याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ते वारंवार दुकानात खरेदीसाठी येऊ लागले.
आरोपींना केडगावमधून अटक (Pune Fraud News)
प्रशांत बर्मेचा हा सोन्याच्या दागिन्यांची विक्री न दाखवता परस्पर कम्प्युटरवर नोंद करायचा आणि कविता पराळे यांना दुकानात व काही वेळा दुकानाच्या बाहेर गाडीत दागिने नेऊन देत होता. त्याने १ ऑक्टोंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या दरम्यान तब्बल १३९ वेळा १८ कोटी रुपयांचे एकूण १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांना दिले. जानेवारी २०२६ मधील पहिल्या आठवड्यात प्रशांत बर्मेचा यांनी तिजोरीमधील ७२ लाख रुपये काढून पिशवीत भरले. दुकानातील शिपायाच्या हस्ते गल्लीतील मर्सिडीज कारमध्ये बसलेल्या कविता पराळे यांच्याजवळ दिले. रांका यांना संशय आल्याने त्यांनी २३ एप्रिलला पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यांच्या तपासादरम्यान आरोपी हे अहिल्यानगरमधील केडगाव येथे असल्याचे समजल्याने खंडणी विरोधी पथक तातडीने केडगावला रवाना झाले. यावेळी प्रशांत बर्मेचा हा रमाकांत पराळे यांच्या रहात्या घरी मिळून आला. तो गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्याच घरी केडगावला राहत होता. पोलिसांनी पराळे यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ३ कोटी ९० लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ३ किलो ५५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ लाख ३० हजार रुपयांचा मोबाईल, १ कोटी ३० लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ कार, ८० हजार रुपये रोख असा तब्बल ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला, तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.
आता या प्रकरणात केडगावमधील ज्या महिलेचा समावेश आहे. तीचे नाव अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणात चर्चेत आलेले आहे. मात्र यावेळी त्यांनी रांका ज्वेलर्स सारख्या मोठ्या नामांकित ब्रॅण्डमधील कर्मचाऱ्याला हाताशी धरत मोठी माया जमवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र याव्यक्तिरिक अजून या प्रकरणात काय काय समोर येणार आहे. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


