नगर : सध्या तरुण मुलांची लग्न होत नसल्याचं चित्र दिसत आहे. याचाच फायदा काही लोक घेत आहेत. आता विवाहासाठी वधू शोधणाऱ्या तीन तरुणांची लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली तब्बल १४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial fraud of Rs 14 lakh) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर अवघ्या पंधरा दिवसांत नववधूंनी घर सोडल्याने या प्रकरणी संशय बळावला. या प्रकरणातील कथित एजंट महिलेला कणगर व अशोकनगर येथील ग्रामस्थांनी पकडून राहुरी (Rahuri News) पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : राज्यात ५ दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नेमका प्रकार काय? (Rahuri News)
राहुरी तालुक्यातील कणगर तसेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील काही तरुण विवाहासाठी वधूच्या शोधात होते. याचदरम्यान त्यांचा संपर्क त्रिशला भारत खिल्लारे या कथित एजंट महिलेशी आला. विवाह जुळवून देण्याचे आश्वासन देत तिने कणगर येथील एका तरुणाकडून चार लाख रुपये, तर अन्य दोन तरुणांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे एकूण १४ लाख रुपयांची रोकड दिल्याचे संबंधितांचे म्हणणे आहे.
अवश्य वाचा : अभिजीत दिपकेंना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर; कोणत्या अटीवर मिळाला जामीन
लग्नानंतर पंधरा दिवसांच्या आत तिन्ही नववधूंनी घर सोडले (Rahuri News)

गेल्या वर्षभरात या तिन्ही तरुणांचे विवाह त्यांच्या नातेवाइकांनी स्वतःचा खर्च करून लावून दिले. मात्र, लग्नानंतर पंधरा दिवसांच्या आतच तिन्ही नववधूंनी घर सोडल्याचे समोर आले. त्यानंतर नवरदेवांच्या नातेवाइकांनी संबंधित मुलींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना पुन्हा सासरी पाठविण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचा संशय अधिक गडद झाला. यातील एक महिला शिर्डी येथे आणखी एका विवाहासाठी येणार असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. त्यानुसार कणगर व अशोकनगर येथील ग्रामस्थांनी तिच्यावर पाळत ठेवून तिला पकडले.
संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केल्यानंतर तिला राहुरी पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. संशयित महिलेचे नाव त्रिशला भारत खिल्लारे असून ती नांदेड येथील रहिवासी आहे. रात्री उशिरापर्यंत तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील अन्य संबंधितांचा शोध घेऊन संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



